कमी मनुष्यबळात होतेय काम; अतिपावसामुळे होणारे नुकसानही कमी
| चौल | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. परंतु, आज भातलागवडीखालील क्षेत्र घटत असले तरी, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आजही कृषी विभागाच्या पुढाकारातून भात उत्पादनात वाढ व्हावी, या उद्देशातून प्रयत्न होताना दिसत आहेत. अशाच प्रकारे अलिबाग तालुक्यातील चौल-वरंडे विभागातील शेतकरी मधुकर गणपत नाईक या शेतकऱ्याने कृषी विभागाच्या सहकार्यातून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत पारंपरिक शेतीत बदल घडवण्यास सुरुवात केली आहे. चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचा प्रयोग केला असून, अन्य शेतकऱ्यांकडूनही त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
चौल, वरंडे या गावांमध्ये सध्या चारसूत्री पद्धतीने भातलागवडीचे काम जोरात सुरू आहे. यावर्षी या परिसरातील मोठ्या क्षेत्रावर ही पद्धत वापरण्यात येणार असल्याची माहिती चौल विभागाच्या उपकृषी अधिकारी के.एस. जामदार यांनी दिली आहे. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भातपिकाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातलागवडीला वेग दिला आहे. चौलमळा गावातील प्रगतशील शेतकरी मधुकर गणपत नाईक यांच्या शेतात चारसूत्री पद्धतीने भातलागवड बुधवार, दि. 9 जुलै रोजी करण्यात आली आहे. उपकृषी अधिकारी के.एस. जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी प्रशांत मुंडे, निलेश पाटील, श्रद्धा बोऱ्हाडे, अशोक मिसाळ यांच्यासह शेतकरी दिनेश नाईक, किशोर नाईक, अल्पेश घरत, मंदार नाईक, मनीष नाईक, माधुरी नाईक, स्वाती नाईक आदींनी उपस्थित राहात प्रत्यक्ष भातलागवडीच्या कामात मदत केली.
या पद्धतीत गिरीपुष्प हिरवळीच्या खताचा वापर करुन दोरीच्या सहाय्याने 25 बाय 25 सेंटीमीटर अंतरावर भात रोपांची लागवड करण्यात आली. प्रत्येक गाठीत फक्त दोन ते तीन रोपे लावण्यात आली. यामुळे भाताला अधिक मोकळे वातावरण मिळते आणि पाण्याचा योग्य वापर होतो. याशिवाय लागवडीनंतर दोन ते तीन दिवसांनी युरिया ब्रिकेट खतगोळ्या चार रोपांच्या मधोमध कशा प्रकारे टाकाव्यात याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. यामुळे भाताच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असल्याचे जामदार यांनी सांगितले.
यावर्षी मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे. मात्र, या पद्धतीमुळे कमी मजुरांमध्येही शेती शक्य होत असल्याने शेतकरी एकमेकांच्या मदतीने भातलागवड करत आहेत. पावसामुळे दरवर्षी नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांनी यावर्षी चारसूत्री पद्धतीच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर कल दर्शवला आहे. प्रगतीशील शेतकरी मधुकर नाईक यांनी सांगितले की, चारसूत्री पद्धतीने भात लागवड केल्याने उत्पन्नात वाढ होते. बियाणे कमी लागते. खताचा खर्च वाचतो. कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न येते.
भातपीक संग्रहालय अनोखे
एकाच शेतात भातपिकाच्या वेगवेगळ्या जातींची लागवड एकाच वेळी करण्यात आली. यामुळे विविध जातींची वाढ, उत्पादन क्षमता, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, येथील हवामानानुसार कोणते पीक तयार होईपर्यंत तग धरुन राहील, आदींचा एकाच ठिकाणी अभ्यास करता येणार आहे, अशी माहिती कृषी सहाय्यक प्रशांत मुंडे यांनी दिली. या अनोख्या भातसंग्रहालयाची शेतकऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
सध्या चौल-वरंडे भागात भातलागवडीची कामे जोरात सुरू आहेत. शेतकरी आधुनिक पद्धतीने लागवडी करू लागले आहेत. चारसूत्री, एस.आर.टी. लागवड, पट्टा पद्धत, श्री पद्धतीने भातलागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. या पद्धतीने शेतकरी भातलागवड करू लागले आहेत. नवनवीन तंत्रज्ञान वापरून भात उत्पादनात वाढ करणे, हेच कृषी विभागाचे ध्येय आहे.
के.एस. जामदार
उपकृषी अधिकारी, चौल विभाग







