चौघांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान

नरसिंह राव, चरणसिंह, कर्पुरी ठाकूर, स्वामीनाथन यांचा समावेश

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉ. एम.एस. स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना शनिवारी (दि.30) मरणोत्तर भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांनी हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार स्वीकारला.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनाही शनिवारीच भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार होता. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव ते राष्ट्रपती भवनामध्ये उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना उद्या 31 मार्च रोजी घरी जाऊन सन्मानित केले जाणार आहे. अडवाणी यांच्याव्यतिरिक्त उर्वरित चौघांना मरणोत्तर भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले.

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांचा मुलगा पी.व्ही. प्रभाकर राव, एम.एस. स्वामीनाथ यांची मुलगी डॉ. नित्या राव, कर्पुरी ठाकूर यांचा मुलगा रामनाथ ठाकूर आणि चौधरी चरण सिंह यांचा नातू जयंत चौधरी यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.

Exit mobile version