| मुंबई | प्रतिनिधी |
जनगणनेच्या कामासाठी जात असताना मावळ तालुक्यातील शिक्षिका दीपाली तांबे यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे भरधाव डंपरने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.विशेष म्हणजे, जनगणनेच्या कामादरम्यान मृत्यू झालेल्या शिक्षकांची संख्या आता चारवर पोहोचली आहे. यापूर्वी कोल्हापूर येथील भगवान पाटील, सांगोला येथील राजाराम ढोले यांचा हृदयविकाराने, तर लातूर येथील सुंदरम वांगसकर यांचा अपघातात मृत्यू झाला होता. शासकीय सुट्टीच्या दिवशीही शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी पाचारण केले जात असल्याने शिक्षक संघटनांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात जनगणनेच्या कामाला अनुपस्थित राहिलेल्या पती-पत्नींसह नऊ शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी तहसीलदार प्रशांत बेंडसे यांनी खेड पोलीस ठाण्याला पत्र दिल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जनगणनेच्या कामात चार शिक्षकांचा मृत्यू
