सेमी फायनलमध्ये पोचले चार संघ

। मुंबई । वृत्तसंस्था ।

आयसीसी वूमन्स टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना पार पडला आहे. या शेवटच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने होते. वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला आहे.

इंग्लंडने विंडिजला विजयासाठी 142 धावांचं आव्हान दिलं होतं. विंडिजने हे आव्हान 4 विकेट्स गमावून आणि 2 ओव्हर राखून पूर्ण केलं. विंडिजने 18 ओव्हरमध्ये 142 धावा करत सामना 6 विकेट्सने जिंकला. इंग्लंडचं पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. सेमी फायनलसाठीचे 4 संघ निश्‍चित झाले आहेत. विंडिज सेमी फायनलमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली आहे.

सेमी फायनलसाठी 4 संघ
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका आणि वेस्टइंडीज हे चार संघ सेमी फायनलमध्ये पोचले आहेत. या स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. हा सामना गुरुवारी 17 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. तर शुक्रवारी 18 ऑक्टोबरला दुसर्‍या सेमी फायनलमध्ये विंडिज विरुद्ध न्यूझीलंड भिडणार आहेत. तर रविवारी 20 ऑक्टोबरला महाअंतिम सामना पार पडणार आहे.
1 ट्रॉफी 2 ग्रुप आणि 4 टीम
वेस्ट इंडिज बी ग्रुपमधून उपांत्य फेरीत पोहचली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेनेही सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. बी ग्रुपमधून सेमी फायनलसाठी विंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये चुरस होती. साखळी फेरीनंतर या तिन्ही संघांनी साखळी फेरीत 4 पैकी 3 सामने जिंकले. मात्र नेट रनरेटच्या जोरावर 2 संघ निश्‍चित झाले. मात्र, तुलनेत इंग्लडचं नेट रनरेट उत्तम नसल्याने त्यांना साखळी फेरीनंतर परतीचा प्रवास करावा लागणार आहे. तर ए ग्रुपमधून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 2 संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहचणारा पहिला संघ ठरला. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील 4 पैकी 4 सामने जिंकले. तर न्यूझीलंडने 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि सेमी फायनलचं तिकीट मिळवलं. टीम इंडियाने साखळी फेरीतील 4 पैकी 2 सामने जिंकले तर 2 सामने गमावले होते. त्यामुळे टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी पाकिस्तानचं न्यूझीलंडवर विजय मिळवणं बंधनकारक होतं. मात्र, पाकिस्तानचा पराभव झाला आणि न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये पोहचली.
Exit mobile version