बंगळुरुमधील बेल कंपनीत निर्मिती
| अलिबाग | प्रमोद जाधव |
लोकसभा निवडणुकीचे वेध जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना लागले असताना प्रशासनदेखील त्या कामाला लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात 4,090 ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन येणार आहेत. बेल कंपनीच्या या मशीन असून बंगळुरूमधून मागविल्या जाणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांनी दिली.
रायगड लोकसभा मतदार संघामध्ये रायगड जिल्ह्यातील चार व रत्नागिरीमधील दोन अशा सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. त्यात पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड तसेच दापोली व गुहागर या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. मागील लोकसभा निवडणुकीमधील आकडेवारीनुसार, या मतदार संघामध्ये दोन हजार पेक्षा अधिक मतदान केंद्र असून 16 लाखापेक्षा अधिक मतदार आहेत.
आणखी वर्षभराने 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्यावतीने लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार शोधण्यास सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरु झाली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांबरोबरच प्रशासकीय यंत्रणेचे देखील या निवडणुकीकडे डोळे लागले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीसाठी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व व्हीव्हीपॅट मशीन आणण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.
रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगळुरुमधून बेल कंपनीच्या ईव्हीएण व व्हीव्ही पॅट मशीन मागविल्या जाणार आहेत. एकूण चार हजार 90 ईव्हीएम व व्हीव्ही पॅट मशीन असणार आहेत. या मशीन लवकरच रायगड जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच बॅलेट सहा हजार 700 व कंट्रोल युनिटच्या तीन हजार 750 मशीन जुलैपर्यंत जिल्ह्यात येणार आहे. या मशीन मागविण्याची तयारी जोरात सुरु केली आहे. या मशीनवर आगामी लोकसभा निवडणुक होणार आहेत.
स्नेहा उबाळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी