30 हजार रुपयांचा ऐवज लंपास
| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा पोलीस ठाण्यापासून 70 मीटरच्या अंतरावर जुन्या सराफी दुकानावर 4 फिरस्त्या महिलांनी काही वस्तू घेण्याच्या बहाण्याने प्रवेश केला आणि 60 वर्षांच्या आजीची फसवणूक करून सुमारे 30 हजार किमतीची मुद्दे मालाची पेटीच गायब केल्याची घटना बुधवारी, (दि.30) रोजी भरदुपारी दोनच्या सुमारास घडली. याबाबत सराफी दुकानाच्या मालक सुषमा सुरेश वेदक (60) रा. म्हसळा सोनार आळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसळा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनानुसार यामध्ये सुमारे 45 वर्षांच्या महिलेने साडी परिधान केली होती, तर 30 वर्षांच्या दोन आणि 10 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीने ड्रेस परिधान केला होता. या चारही महिला सावळ्या रंगाच्या असल्याचे सुषमा आजीने सांगितले. 10-12 वस्तू असलेल्या वस्तू सोडून अन्य वस्तूंची संबंधित महिलांनी मागणी केली असता सुषमा आजीने पेटी तिथेच सोडून अन्य वस्तूच्या शोधात घरात गेल्या असता या चार महिलांनी पेटीवर डाका मारल्याचे सांगितले. बाजार भावाप्रमाणे गेलेला ऐवज किमान एक लाख रुपयांचा होता, असा दावा सुषमा आजीचा आहे.