सागर रक्षक दलाच्या तत्परतेमुळे वाचले प्राण
। उरण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळवण्यासाठी आणि समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी दाखल होत आहेत. शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने पिरवाडी किनाऱ्यावर सध्या पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र, या आनंदमयी वातावरणात एक थरारक घटना घडली आहे.
नागाव-पिरवाडी किनारपट्टीजवळील समुद्राच्या मध्यभागी चार तरुण भरतीच्या पाण्यात अडकले. समुद्रात फिरण्यासाठी गेलेल्या या तरुणांना भरती सुरू झाल्याने परत येणे अशक्य झाले. तसेच, पाण्याचा वेग आणि खडकाळ रचना यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. सुदैवाने, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सागर रक्षक दलाला याबाबत माहिती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन सागर रक्षक दलाने तात्काळ बोट घेऊन समुद्रात प्रवेश केला. त्यावेळी समुद्रात उधाण होते, लाटा जोरात धडकत होत्या आणि संपूर्ण परिसर खडकाळ असल्यामुळे मदतकार्य करणे अत्यंत धोकादायक होते. परंतु, दलातील पवार आणि मिसाळ या अधिकाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य सुरू केले. त्यांच्या मदतीला दलाचे सदस्य योगेश काठे, नौशाद कुरेशी, संतोष कडू आणि अकबर कुरेशी यांनीही तत्परता दाखवली. या सर्वांनी समन्वयाने काम करत समुद्राच्या मध्यभागी अडकलेल्या चार तरुणांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले.
शैलेश काटे (२२), सुमेध मिश्रा (२४), सागर नावणे (२४) आणि सुमेध अवस्कर (२२) अशी बचावलेल्या तरुणांची नावे असून हे सर्वजण ऐरोली, नवी मुंबई येथील रहिवासी आहेत. सागर रक्षक दलाच्या तत्पर आणि धाडसी कार्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि चार तरुणांचे प्राण वाचले.
या घटनेनंतर समुद्रात उतरताना काळजी घेण्याचे तसेच, अधिकृत मार्गदर्शनाशिवाय खोल समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन स्थानिक प्रशासन आणि सागर रक्षक दलाने पर्यटकांना केले आहे.