एक वर्षाचा कालावधी उलटून काम सुरू न करण्याचा ठपका
| अलिबाग | प्रतिनिधी |
जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांचे कार्यारंभ आदेश देऊन एक वर्षाचा कालावधी उलटून गेला. तरीही ठेकेदारांनी कामे सुरु केली नसल्याने त्यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्ह्यातील 14 ठेकेदारांकडून 26 योजनांची कामे काढून घेण्यात आली असून, या ठेकेदारांना एक वर्षासाठी काळया यादीत टाकण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात गावागावात पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी जलजीवन मिशनअंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या, प्रगतीपथावर असलेल्या योजना तसेच घरोघरी नळ जोडणी यांचा तालुकानिहाय आढावा अधिकारी, ठेकेदार, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत घेतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून आढावा घेण्याची कामे तालुका स्तरावर सुरु होती.
पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेतल्यानंतर कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार कार्यारंभ आदेश देऊनही एक वर्षांचा कालावधी उलटला तरीदेखील योजनेचे कामे न करणाऱ्या 26 योजनांचा ठेका रद्द करीत, 14 ठेकेदारांना काळया यादीत टाकण्यात आले आहे. यामध्ये पनवेल तालुक्यातील 15 योजना असून, कर्जत 3, महाड 1, अलिबाग 2, उरण 3, मुरुड 2 योजनांचा समावेश आहे. या 26 योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पुन्हा निविदा प्रक्रिया सुुरू केली आहे.
प्रतिमाणशी मिळणार 55 लिटर पाणी ग्रामीण भागातील सर्व कुटूंबांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन योजना सुरु केली आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना 2024 पर्यंत हर घर नल से जल या योजनेमधून पाणीपूरवठा करण्यात येणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. या योजनेमध्ये प्रतिमाणसी किमान 55 लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे.







