चौदा मंत्री कार्यभाराविनाच; अजितदादांचा हल्लाबोल

Maharashtra, September 28 (ANI): Senior NCP leader Ajit Pawar addressing a press conference, in Mumbai on Friday. (ANI Photo)

। मुंबई । प्रतिनिधी ।

शिंदे-फडणवीस सरकारच्या 18 पैकी 14 मंत्र्यांनी अद्यापही खात्याचा कार्यभार स्विकारलेला नाही. त्यामुळे मंत्रालयात लोकांची कामे खोळंबली आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला. तसेच मुख्यमंत्री प्रशासकीय कामे सोडून घरोघरी फिरत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. ते सोमवारी (दि.12) विधान भवनातील वार्ताहर कक्षात आयोजित विशेष पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यातील विद्यमान सरकारला अडीच महिने होत आले तरी, मंत्रीमंडळाचा पूर्ण विस्तार झालेला नाही. जिल्ह्यांना पालकमंत्री नेमले नाहीत. मंत्र्यांच्या कार्यालयात फाईलींचा डोंगर साठला आहे. मुख्यमंत्री प्रशासकीय कामे सोडून घरोघरी फिरत आहेत. राजकीय सभा घेऊन शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना वेठीस धरण्यात आले असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीसांनी राजकीय सभेला उपस्थित राहण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. अंगणवाडीतील मुलांना सोडून अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजेरी लावत असल्याने गावात मुलांची काळजी कोण घेणार? हा प्रश्‍न राज्याला पडला आहे, असे अनेक सवालही पवारांनी यानिमित्ताने उपस्थित केले आहेत.

अजित पवार पुढे म्हणाले, राज्य सरकारच्या स्थगिती आदेशामुळे विकासकामे खोळंबली आहेत. जिल्ह्यांना पालकमंत्री मिळेपर्यंत जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च करण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. आर्थिक वर्षाचे सहा महिने उलटले. हिवाळी अधिवेशनापर्यंत पालकमंत्री न नेमल्यास उर्वरीत काळात निधी खर्च कसा करणार हा सुद्धा प्रश्‍न आहे? याकडेही त्यांनी प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले.

सत्तारुढ पक्षाचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरुन हाणामारी करीत आहेत. सत्तारुढ आमदारांवर गोळीबार केल्याचा आरोप होत आहे. हे सगळं प्रगत, पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणं आहे.

अजित पवार,विरोधी पक्षनेते
Exit mobile version