व्हय म्हाराजा, महामार्गाचा पाळणा यंदा हलू दे

महामार्गाच्या चौथ्यांदा भूमिपूजनावरुन
कोकणवासियांचे देवाला गार्‍हाणे

| पेण | संतोष पाटील |
व्हय म्हाराजा, महामार्गाचा पाळणा यंदा हलू दे, अशा आर्त विनवणी समस्त कोकणवासियांनी गुरुवारी आपापल्या देवदेवतांना घातली. निमित्त होते. गेली एक तप रखडलेल्या मुंबई -गोवा महामार्गाच्या चौथ्यांदा करण्यात आलेल्या भूमिपूजन सोहळ्याचे. खारपाडा येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत या महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा चौथ्यांचा नारळ फोडला आणि समस्त कोकणवासियांनी जय देवा महाराजा बारा गावच्या, बारा राठिच्या, बारा वहिवाटीच्या महाराजा, सालाबादप्रमाणे चौथ्यांदा नारळ फुटला महाराजा. जर कुणी उभ आलं तर आडव कर आडव आलं तर त्याला उभ कर वडाची साल पिंपळाला लाव पिंपळाची साल वडाला लाव याचे दात त्याच्या घशात त्याचे दात याच्या घशात घाल रे महाराजा. पण नितीन रावांनी नउ महिन्याचा कालावधी दिला रे महाराजा. एकदाचं यंदा पालणा मुंबई-गोवा महामार्गाचा हलू दे रे महाराजा,अशी मनोभावे प्रार्थना केली.

ही प्रार्थना करताना कोकणवासिय म्हणत होते मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्यांच्या चौपदरी करणाला सुरूवात होउन 13 वर्ष पूर्ण होऊन गेले. आमदारांचे मंत्री झाले, मंत्र्याचे खासदार झाले. परंतु, कोकणचा भाग्यविधाता समजणार्‍या आमच्या सुनिलरावांना काही जमले नाही. परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नऊमहिन्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणार असल्याची गर्जना राणाभीमदेवी थाटात केली आहे. ती पूर्ण होतोय की नाही याची वाट बघण्या व्यतिरिक्त कोकणी माणसाच्या हातात काहीच नाही.अशी अपेक्षाही कोकणी माणसाने व्यक्त केली आहे.

2011 ते 2023 चार सरकारचे परिवर्तन झाले. परंतु 84 किलो मीटरचा पहिला टप्पा पूर्ण काही झाला नाही. रामनवमीच्या शुभ मुहुर्तावर पुन्हा एकदा नारळ फोडण्याचे काम झालेले आहे. आता मंत्री महोदययांनी दर दिवशी ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून रस्त्याच्या कामावर नजर ठेऊन ही माहिती वेबसाईट वर टाकली जाईल असे सांगितले. परंतु रायगडवासीय हे आश्‍वाासनाला एवढे कंटाळलेले आहेत की, नऊ महिन्यात कॉक्रीटीकरण होईल यावर विश्‍वास नाही. कारण उद्घाटन आणि भूमिपूजन होऊन 13 वर्षाचा काळ सरला आहे. तीन रुपयाच्या नारळाची किंमत 25 रूपये झाली आहे. परंतु महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम आजही पूर्ण झाले नाही. यावरून आपण समजायचे की मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम व्हावे की नाही हे रायगडच्या लोकप्रतिनिधींची मानसिकताच नसल्याचे पहायला मिळते. या महामार्गाच्या आजच्या स्थितीत देखील काही ठिकाणी जमिनी हस्तांतरीत केलेल्या नाहीत. तर एक वर्षात काम कसे पूर्ण होईल याबाबत रायगडकरांच्या मनात शंका आहे.

या कार्यक्रमासाठी पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा.श्रीरंग बारणे, खा. सुनिल तटकरे,आ. रवींद्र पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुंबई विभागाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, मुख्य अभियंता श्री.शेलार, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल तहसिलदार विजय तळेकर, पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीरंग बारणे, सुनिल तटकरे, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, यांची समयोचित भाषणे झाली.

गडकरींचा आदर्श घ्या -तटकरे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविषयी खा.सुुनिल तटकरे यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले.गडकरी साहेब नेहमीच विकासाला चालना देतात, ते राजकारणात अजातशत्रू म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत त्यांनी सातत्याने विकास कामांना प्राधान्य दिले आहे. विकासाच्या कामांत ते कधीही राजकारण आणत नाहीत किंवा राजकारण करत नाहीत, त्यांचा हा आदर्श इतरही नेत्यांनी अंगिकारला पाहिजे असा मिस्कील टोला देखील सुनील तटकरे यांनी व्यासपीठावर उपस्थित भाजपच्या इतर पदाधिकार्‍यांना दिला. तटकरे यावेळी म्हणाले की नितीन गडकरी यांच्या कामकाजाची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. संपूर्ण देशात विकास दृष्टीक्षेपात ठेऊन ते कार्यतत्पर राहून ज्या पद्धतीने कामे करतात तसा आदर्श इतरांनी घ्यावा.सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील गडकरी साहेबांप्रमाणे काम करावे असे खा.तटकरे म्हणाले.

Exit mobile version