विकासाच्या नावाखाली फक्त कुरघोड्या
| पाली/वाघोशी | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील पाली नगरपंचायतीत पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होत असून, अवघ्या पाच वर्षांत चौथ्या नगराध्यक्षाची निवड होणार आहे. नगराध्यक्षपदावर सतत होणारे बदल हे पालीच्या विकासकामांसाठी घातक ठरले आहेत. पवित्र बल्लालेश्वराच्या नगरीत नागरिकांना आजही अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे, फिल्टर पाणी योजना कागदावरच धूळ खात पडली आहे, तर राजकारणी मात्र फक्त खुर्चीच्या कुरघोड्यांत व्यस्त असल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पाली नगरपंचायतीत एकूण 17 सदस्य असून 2 सदस्य बाद झाले आहेत. सध्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 5, शिवसेना (शिंदे गट) 5, भाजप 4 आणि शेकाप 1 अशी आहे. राज्यस्तरीय पातळीवर भाजप-शिंदे गट-अजित पवार गट अशी महायुती एकत्र असली तरी पाली नगरपंचायतीत मात्र एकी साधली नसल्याने तिरंगी लढत होणार, हे निश्चित झाले आहे.
या पदासाठी कल्याणी संदीप दपके शिवसेना (शिंदे गट), नलिनी गणेश म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), पराग विजय मेहता भारतीय जनता पार्टी हे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2022 मध्ये स्थापन झालेल्या पाली नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षा गीता ताई पालरेचा होत्या. त्यांच्या राजीनाम्यानंतर प्रणाली शेळके नगराध्यक्षा झाल्या. मात्र पक्षांतर्गत कारवाईनंतर प्रभारी म्हणून आरिफ मणियार यांची नियुक्ती झाली. आणि आता 10 सप्टेंबर रोजी विशेष सभेत चौथ्या नगराध्यक्षाची निवड होणार आहे.







