नोकरीच्या आमिषाने फसवणूक

स्वयंघोषित समाजसेविका अटकेत
। पेण । प्रतिनिधी ।
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरुन स्वयंघोषित समाजसेविका प्रविणा सावंत हिला पेण पोलिसांनी अटक केली आहे. पेण पोलीस ठाण्यात निवृत्त शिक्षक अजय पाटील यांनी सावंत यांच्या विरूध्द नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद नोंदवली आहे. या अगोदर अजय पाटील यांनी 6 जून रोजी पेण पोलीस ठाणे पोलीस अधिक्षक रायगड यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. त्यामध्ये देखील प्रविणा प्रफुल्ल सावंत व अर्जुन कामत उर्फ अतुल मांडवकर यांनी फसवणूक केल्याचे म्हटले होते. त्या नंतर जवळपास एक महिना उलटल्यानंतर शेवटी 6 जुलै रोजी उशीरा पेण पोलीस ठाण्यात प्रविणा सावंत व अतुल मांडवकर यांच्या विरूध्द भादवी कलम 420/34 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

प्रविणा सावंत व तिचा ड्रायव्हर अतुल मांडवकर (अर्जुन कामत) यांनी संगणमताने जवळपास 39 फिर्यादीच्या नातेवाईक व मित्र परिवारांची फसवणूक करून 29 लाख 69 हजार रूपये घेतल्याचे म्हटले आहे. जेएसडब्ल्यू कंपनीच्या एचआर डिपार्टमेंटमध्ये कामाला लावतो असे सांगून वेळोवेळी 20 जानेवारी 2022 ते 28 एप्रिल 2022 या दरम्यान पैसे घेतल्याचे म्हटले आहे. तसेच फिर्यादीकडून भंगार उचलण्याचा ठेका देण्याच्या बदल्यात 2 लाख रूपये देखील घेतले आहेत. फिर्यादींनी वेळोवेळी प्रविणा सावंत यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास नकार दिला. वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या व्यासपिठावर अर्वजुन उपस्थित राहून स्वतः पुढारी असल्याचे सर्व सामन्यांना भासवत आहेत. याच गोष्टीमुळे फिर्यादी तिच्या भूलथापांना फसल्या असल्याचे देखील सांगितले आहे. सदरील गुन्हयाचा तपास पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रदिप काळे हे करत आहेत. या गुन्हयातील प्रमुख आरोपी प्रविणा सावंत यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे.

Exit mobile version