बनावट आधार, पॅनकार्ड बनवून फसवणूक

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत शहरातील गृह प्रकल्पात सदनिका घेण्यासाठी बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवून त्याआधारे हौसिंग लोनची 18 लाख 40 हजारांची रक्कम हडप करण्याचा प्रकार कर्जत पोलीस ठाणे हद्दीत झाला. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, त्याबाबत टाटा कॅपिटल हौसिंग कंपनीने आपली फसवणूक केली असून, न्यायालयात दाद मागितल्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे. कर्जत दहिवली येथील कृष्णा हाईटस राधे कृष्णा हाईट कॉम्प्लेक्समध्ये सदनिका घेण्यासाठी टाटा हौसिंग फायनांस कंपनीकडे कर्ज घेण्यासाठी अंबरनाथ येथील सीताराम राजाराम मोरे आणि शिल्पा सीताराम मोरे यांनी आपली मिळकत गहाण ठेवून प्रयत्न सुरु केले. त्यावेळी मोरे दाम्पत्याने आपली बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड यांच्या माध्यमातून टाटा कॅपिटल हौसिंग कंपनी कडे 18 लाख 40 हजाराचे कर्ज घेतले. त्यानंतर त्या कर्जाची रक्कम सुशील कुमार राम स्वरूप सोनी याच्या अकाऊंटवर वर्ग केली आणि हा घोटाळा केला.

मोरे आणि सोनी या तिघांनी संगनमत करून टाटा कॅपिटल कंपनीची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता फसवणूक केली आहे. त्याबाबत टाटा कॅपिटल कंपनीचे व्यवस्थापक वर्माश सहदेवन यांनी कर्जत न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने सीताराम मोरे, शिल्पा मोरे आणि सुशील कुमार राम स्वरूप सोनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे हे करीत आहेत.

Exit mobile version