| पनवेल | वार्ताहर |
चालवण्यासाठी दिलेल्या कारचे भाडे वेळेत न देता कार मित्राकडे गहाण ठेवली. टी परमीट असताना त्यात बदल करून कारला पांढरी नंबर प्लेट लावून कारचा वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी तुळशीदास लक्ष्मण तेलंगे रा. चिखलोली पाडा, अंबरनाथ याच्याविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेघा चेंदवणकर या आकुर्ली, वीर पार्क येथे राहतात. त्यांची वेदांत टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाची कंपनी आहे. त्यांनी त्यांची कार तुळशीदास तेलंगे यांना चालवण्यासाठी भाड्याने दिली होती. सुरुवातीला त्याने भाडे बँक खात्यात पाठवत होता. त्यानंतर त्याने पैसे देण्यास उशीर केला. त्यामुळे त्याच्याकडून गाडी परत घेण्यात आली व पुन्हा त्याला कार चालवण्यासाठी दिली. दरम्यान, जानेवारी 2025 मध्ये मेघा यांचे पती अंबरनाथ येथील तेलंगे यांच्या घरी गेले. या वेळी कार मागितली असता ती त्याचा मित्र सोनू याच्याकडे असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी सोनूला विचारले असता, त्याच्याकडे कार गहाण ठेवल्याचे सांगितले.







