व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा बाजारपेठेत मंगळवारी (दि. 2) दुपारी उघडपणे फसवणुकीचा प्रकार घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारी 2.45 वाजता राहुल इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात आलेल्या एका ग्राहकाने खोटा मोबाईल मेसेज दाखवून तब्बल 7,500 रुपयांचा कंपनीचा स्पीकर घेऊन पलायन केले.
“पैसे स्कॅनरवर जात नाहीत, मोबाईल नंबर द्या” असे सांगून त्या ग्राहकाने संगीता राजेंद्र जैन यांचा नंबर घेतला. लगेचच मोबाईलवर पैसे ट्रान्सफर झाल्याचा खोटा मेसेज दाखवून तो फरार झाला. या घटनेमुळे दुकानाचे मालक राहुल राजेंद्र जैन यांचे आर्थिक नुकसान झाले असून, याबाबतची तक्रार त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या संशयित व्यक्तीचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असूनही बाजारपेठेत अशी फसवणूक दिवसाढवळ्या घडणे धक्कादायक मानले जात आहे. स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, “बाजारपेठेत पोलीस गस्त नसल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. दिवसाढवळ्या फसवणूक होणे म्हणजे आमच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह आहे.” व्यापारी वर्गाने पोलीस प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली असून, आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा करावी, असा आवाज उठवला आहे. दरम्यान, या घटनेची चर्चा सर्वत्र रंगली असून, व्यापारीवर्गात “उद्याचा बळी मी तर नाही ना?” अशी भीती निर्माण झाली आहे.







