रायगड जिल्ह्यात कोटयवधींची फसवणूक

गुन्हा दाखल करण्याऐवजी कोर्टात जा; पोलिसांचा अजब सल्ला
डॉ प्रमोद म्हात्रे यांचा आरोप

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन त्यापोटी दरमहा ठराविक रक्कम देण्याचे आमिष दाखवून रायगड जिल्ह्यात कोटयवधींची फसवणूक करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केलेल्या तक्रारीनंतर सदर तक्रारीची चौकशी करण्याऐवजी अलिबाग पोलिसांनी तक्रारदारांना सदर बाब दिवाणी असल्याने तुम्ही न्यायालयात दाद मागा असा अजब सल्ला दिल्याचा आरोप डॉ प्रमोद म्हात्रे यांनी केला आहे.


पॅरेडीगम एज मार्केटींग सर्व्हीसेस असे या गुंतवणूकदार कंपनीचे नाव आहे. डॉ. प्रमोद म्हात्रे यांच्याकडे सदर कंपनीच्या कमिशन एजंट म्हणून किर्ती सतिश अट्रावलकर यांनी गुंतवणूकीवर आर्कषक लाभ देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार सदर रक्कम करन्सीज, इक्वीटीज, कमोडीटीज मार्केटमध्ये गुंतवणूक करुन त्यावर आकर्षक अशी दर महिन्याला तीन ते चार टक्के मासिक नफ्याची रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडून 50 हजार स्विकारले. त्यापोटी तीन महिने नफ्याची रक्कम देण्यात देखील आली. मात्र त्यानंतर सदर रक्कम देणे बंद करण्यात आले. त्याबाबत विचारणा केली असता, पुढील महिन्यात नियमितपणे नफ्याची रक्कम देण्याचे कबुल केले. तरी देखील सदर रक्कम देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे सदर गुंतवणूकीची मुदत संपल्यानंतर देखील त्यापोटीचा नफा आणि मुळ रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येऊ लागली. त्यामुळे प्रमोद म्हात्रे यांनी सदर कंपनीच्या मुंबई तसेच अलिबाग कार्यालयात नोटीसा पाठवल्या. मात्र सदर कार्यालय बंद असल्याने या नोटीसा परत आल्या. यासंदर्भात संतोष जाधव यांनी प्रमोद म्हात्रे यांची अलिबाग येथे प्रत्यक्ष भेट घेऊन 8 दिवसात कुुुंदन म्हात्रे हे स्वतः येऊन मुद्दल व नफा अशी एकरकमी देतील असे आश्‍वासन दिले. त्यानुसार कुंदन म्हात्रे यांनी फोनवरुन तसेच मेसेज करुन तसे आश्‍वासन स्वतः देखील दिले. प्रत्यक्षात एकही रुपया दिलेला नाही.

प्रत्येक वेळी टोलवाटोलवी करीत ही रक्कम देण्याचे टाळाटाळ करण्यास सुरुवात केल्यान अखेर प्रमोद म्हात्रे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे लेखी तक्रार केली. त्यानुसार अधिक्षक कार्यालयाकडून सदर तक्रार अलिबाग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. अलिबाग पोलिसांनी प्रमोद म्हात्रे यांना बोलावून घेतले मात्र प्रत्यक्षात त्यांना सदर प्रकरण हे दिवाणी असल्याने आपण न्यायालयात जाऊन दाद मागा असा सल्ला दिला. त्यामुळे डॉ म्हात्रे आश्‍चर्यचकित झाले. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेण्याची मागणी डॉ प्रमोद म्हात्रे यांनी केली आहे. या प्रकरणात अनेक जणांचे पैसे गुंतले असून जिल्ह्यातील अनेक नागरिक समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

Exit mobile version