नारंगीमध्ये शेतकर्‍यांची फसवणूक

शेतकर्‍यासोबत आत्मदहन करण्याचा मा.आ. सुरेश लाड यांचा इशारा
। खोपोली । प्रतिनिधी ।
प्रस्तावित नारंगी एमआयडीसीमध्ये स्थानिक शेतकर्‍यांची फसवणूक करून जमीन लाटणार्‍यांच्या विरोधात गेले काही दिवस वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याने शेतकर्‍यांसोबत आत्मदहन करण्याचा इशारा माजी आ.सुरेश लाड यांनी दिला आहे. सरकार दुर्लक्ष करत असल्याने आता आरपारची लढाई सुरू केली असून न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही असेही लाड यांनी म्हटले आहे. खालापूर तालुक्यातील प्रस्तावित नारंगी एमआयडीसीमध्ये शेतकर्‍यांची फसवणूक करून न्यू मिलेनियम कंपनीने जमिनी लाटल्याचा आरोप भूषण पाटील आणि स्थानिक शेतकर्‍यांकडून केला जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा या सर्व प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असून त्यांनी नातेवाईकांच्या नावे जमिनी खरेदी केल्याचा दावाही शेतकरी आणि भूषण पाटील यांच्याकडून केला जात आहे. या संदर्भात न्याय मिळावा यासाठी शेतकर्‍यांनी खालापूर तहसील कार्यालयासमोर उपोषणही केले आहे. शेतकर्‍यांना कंपनीने दिलेले धनादेश वटलेले नाहीत. यावेळी मा.आमदार सुरेश लाड यांनी तहसिलदार आयुब तांबोली यांची कार्यालयात भेट घेवून चर्चा केली. यावेळी जि.प.सदस्य नरेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे, उपोषणकर्ते भूषण पाटील सर्व शेतकरी उपस्थित होते. तहसिलदार आयूब तांबोळी यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क करून योग्य मार्ग काढण्याचा शब्द दिला. गेली अनेक दिवस शेतकरी न्याय मिळावा यासाठी लढा देत आहेत. वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याने दि.23 डिसेंबर पर्यंतची मुदत देत पुढील आंदोलन हे शेवटचे असून शेतकर्‍यांसोबत आत्मदहन करण्याचा इशारा माजी आ.सुरेश लाड यांनी दिला.

Exit mobile version