| पनवेल | वार्ताहर |
ग्रुपमधील इतरांच्या नफ्याला भुलून गुंतवणूक करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. गुन्हेगारांच्या जाळ्यात फसून या व्यक्तीने महिन्याभरात 62 लाख रुपये गमावले आहेत.
तळोजा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्ती बरोबर हा प्रकार घडला आहे, महिन्याभरापूर्वी त्यांना ऑनलाइन शेअर मार्केटची माहिती मिळाली होती. गुंतवणुकीस इच्छुक असल्याचे दाखवल्याने त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये घेण्यात आले होते. त्या ठिकाणी इतर व्यक्तींकडून नफ्याच्या रकमा पाहून आपल्यालाही मोठा धनलाभ होईल, असा विश्वास त्यांचा बसला. त्यांनी महिन्याभरात 62 लाख रुपये संबंधितांच्या खात्यावर पाठवले. मात्र, नफ्याची काही रक्कम काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या कारणांनी अधिक पैशाची मागणी होऊ लागली. ही रक्कम भरण्यासाठी त्यांनी एका मित्राकडे पैशाची मागणी केली होती. यावेळी त्या मित्राने त्याच्या पत्नीची अशा प्रकारातून फसवणूक झाली असल्याचे सांगितले. यावरून त्यांना आपण गुन्हेगारांच्या जाळ्यात फसल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार करताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







