ग्राहकांचे बनावट सोने ठेवले तारण
| पनवेल | वार्ताहर |
के.एल. एम. अॅक्सीव्ह फिनवेस्ट लि. या फायनान्स कंपनीच्या पनवेल शाखेत कार्यरत असलेल्या व्यवस्थापकाने ग्राहकांसोबत संगनमत करून बनावट, तसेच कमी प्रतीचे (कॅरेटचे) सोने तारण ठेवून तब्बल 21 लाख 88 हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महेश महादेव कदम असे या व्यवस्थापकाचे नाव असून, पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
के.एल.एम. अॅक्सीव्ह फिनवेस्ट लि. ही फायनान्स कंपनी केरळ राज्यातील असून, या कंपनीची शाखा पनवेलमध्ये आहे. या शाखेमध्ये व्यवस्थापक म्हणून महेश कदम यांची नेमणूक करण्यात आली होती. कदम यांनी या पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर फायनान्स कंपनीकडे येणार्या ग्राहकांसोबत संगनमत करून अफरातफर करण्यास सुरुवात केली. मात्र, या फायनान्स कंपनीकडून प्रत्येक महिन्याला ऑडिट करण्यात येत असल्याने मार्च 2023 मध्ये पनवेल शाखेच्या व्यवहारामध्ये घोटाळा दिसून आला. तपासाअंती व्यवस्थापक महेश कदम याने बनावट व कमी प्रतीचे सोने तारण ठेवून तब्बल 32 लाख 35 हजार रुपयांचा अपहार केल्याचे आढळून आले. त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी महेश कदम याच्याकडे याबाबत चौकशी केली असता, त्याने आपली चूक कबूल केली. तसेच ग्राहकांकडून पैसे वसूल करून देण्याचे आश्वासन कंपनीला दिले होते. त्यानंतर महेश कदम याने काही ग्राहकांकडून दहा लाख 46 हजारांची रक्कम वसूल करून कंपनीला दिली. मात्र त्यानंतर कदम याने उर्वरित 21 लाखांची रक्कम कंपनीला आजतागायत परत दिलेली नाही.






