| पनवेल | वार्ताहर |
एअर इंडियामध्ये अधिकारी असल्याचे भासवून सायबर टोळीने नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाकडून ऑनलाईन 3 लाख 43 हजारांची रक्कम उकळली आहे. या प्रकरणी फसवणूक तसेच आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामोठे येथे राहणाऱ्या तुषारने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये एअर इंडियाच्या वेबसाइटवर नोकरीसाठी माहिती टाकली होती. काही दिवसांमध्येच राजीव बन्सल नावाच्या व्यक्तीने एअर इंडियामधून बोलत असल्याचे भासवून तुषारशी संपर्क साधला होता. या वेळी व्हॉट्सॲपवरून व्हिडीओ कॉलवर तुषारचा इंटरव्ह्यू घेण्यात आला; तर दोन दिवसानंतर नोकरी लागल्याचे पत्र त्याच्या घरी पाठवण्यात आले होते. तसेच मुंबईत ट्रेनिंग होणार असल्याचे सांगून सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 28,778 रुपये भरण्यास सांगण्यात आले. तुषारने सांगितलेली रक्कम ऑनलाईन पाठवून दिल्यानंतर त्याच्याकडे वांरवार पैशांची मागणी होत होती. त्यानंतर, मात्र संशय आल्याने एअर इंडियामध्ये याबाबतच प्रत्यक्ष जाऊन खातरजमा केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोर्टलवर तक्रार दिली आहे.