| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
ब्लॉक ट्रेडिंगमध्ये मार्केटपेक्षा 20 ते 30 टक्के कमी दराने स्टॉक ट्रेडिंग करून मिळेल असे खोटे सांगून 47 लाख 87 हजार 100 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पारथा मुखर्जी हे खारघर येथे राहात असून, त्यांना शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन ट्रेडिंग करायची सवय आहे. त्यांना फेसबुक अकाऊंटवर एका कंपनीच्या नावाचे पेज दिसले. त्यावेळी ब्लॉक ट्रेंडिंगमध्ये मार्केटपेक्षा 20 ते 30 टक्के कमी दराने स्टॉक ट्रेडिंग करून मिळेल असे नमूद केले होते. त्या पेजवर क्लिक केले असता व्हॉट्सअॅप ग्रुप ओपन झाला. त्यानंतर ग्रुपवर चॅटिंग सुरु झाली. ट्रेंडिंग कशी करायची यावर माहिती घ्या असे सांगण्यात आले. त्यानंतर व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिन, त्याचा असिस्टंट, कस्टमर सर्विसधारक आणि कंपनीचे हेड समिक दास शर्मा यांनी संगनमत करून मुखर्जी यांना आयपीओ ट्रेडिंगच्या गुंतवणुकीवर रजिस्ट्रेशन नंतर ओपन झालेल्या पेजवर वाढीव रक्कम जमा झाल्याचे भासवले आणि वेगवेगळ्या बँक खात्याची माहिती पाठवून त्यावर 47 लाख 87 हजार 100 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पैसे परत मागितले, मात्र पैसे परत दिले नाहीत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.