भूषण पाटील यांचा उपोषणाचा इशारा
खोपोली | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील गोठीवली, गोहे, नंदनपाडा, या गावातील जमिनी न्यू मिलेनियम कंपनीकडून कर्जत खालापूरच्या लोकप्रतीनिधींचे नातेवाईक खरेदी करत असून संबंधित प्रकरणात खरेदी ऑर्डर रद्द करण्याची मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने या भागातील शेतकर्यांसह सोमवारी दि.18 ऑक्टोबर पासून उपोषणाला बसण्याचा इशारा थेट स्थानिक लोक प्रतीनिधीवर आरोप करत खळबळ उडवून देणारे राष्ट्रवादीचे जिल्हा युवक उपाध्यक्ष भूषण पाटील यांनी दिला आहे.
कंपनी कायद्याप्रमाणे औद्योगीकीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. यातील काही जमिनी लोकप्रतींनिधीचे नातेवाईक आणि शासनाच्या सचिव पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींनी खरेदी केल्याचा भूषण पाटील यांचा आरोप आहे.
जिल्हाधिकार्यांनी दिलेली खरेदी ऑर्डर रद्द करण्याची मागणी स्थानिक शेतकर्यांसह भूषण पाटील यांनी केली आहे. कोणतेही खरेदी खत न करता शेतकर्यांची फसवणूक करून जमिनीची परस्पर विक्री झाल्याने शेतकरी मोबदल्यापासून वंचित राहिल्याचे सांगत धनादेश मुदतीत न वटल्यामुळे या जमिनी शेतकर्यांच्या नावावर पूर्ववत कराव्यात अशी मागणी भूषण पाटील यांनी केली आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने 18 ऑक्टोबर पासून अन्यायग्रस्त शेतकर्यांहसोबत उपोषणाला बसण्याचा इशाराही भूषण पाटील जिल्हाधिकार्यांना पाठवलेल्या निवेदनातून दिला आहे.