सोशल मिडियावर जनतेची दिशाभुल; एकनाथ शिंदेंचा जुना व्हिडीओ केला शेअर
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जनमानसात ढासळत चाललेली प्रतिमा उजळवण्याचा बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यकर्त्यांचा केविलवाणा प्रयत्न सध्या चालु आहे. याचेच उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना घेतलेल्या बैठकीचा व्हिडीओ शेअर करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक झाल्याचे भासविले आहे. सदर बैठकीचा व्हिडीओ हा गेल्यावर्षी एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री असतानाचा आहे. या व्हिडीओचा खोटारडेपणा समोर आल्याने आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे हसे होत आहे. मात्र या प्रयत्नात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रकार घडल्याने जनतेमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेने हकालपट्टी केलेले बंडखोर आमदार समर्थक माजी तालुकाप्रमुख राजा केणी यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या बैठकीचा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅ. ए. आर. अंतुले साहेबांचे आमदार महेंद्र दळवींनी स्वप्न साकार केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनात रेवस-करंजा पुल उभारणीच्या कामाचा आढावा घेताना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब व शासकीय अधिकारी. मात्र या व्हिडीओत ‘सीएम साहेब बोलले ना, कोस्टल रोड सुंदर करा, म्हणून हा ब्रीज पण आपल्याला सुंदर करायचाय’ असे वक्तव्य एकनाथ शिंदे करताना दिसत आहेत.
आज ते स्वतःच मुख्यमंत्री असताना असे कसे बोलतील, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या एका वाक्यातूनच हा व्हिडीओचा खोटारडेपणा समोर आला आहे. दुसरे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दालनात कामाचा आढावा घेताना असे म्हटले आहे. मात्र ते दालन हे मुख्यमंत्र्यांचे नाही, हे देखील स्पष्ट दिसते. ना कुठे मुख्यमंत्र्यांची पाटी आहे.
सध्या मंत्रालयात पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी आणण्यात आली आहे. या व्हिडीओत एकनाथ शिंदे यांच्या टेबलावर अनेक बाटल्या दिसत आहेत. तसेच सर्व अधिकार्यांनी मास्क घातला आहे. सध्या अशा बैठकांमध्ये देखील शिंदे मास्क घालताना दिसत नाहीत. त्यामुळे हा व्हिडीओ जुना असल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षी झालेल्या बैठकीत सदर पुलाचे काम ऑक्टोबरमध्ये मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तर आज एका युटयुब चॅनलवर प्रतिक्रीया देताना आमदारांनी पुन्हा ऑक्टोबरमध्ये काम मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नक्की कुठल्या ऑक्टोबर महिन्यात काम मार्गी लावणार, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. स्वतःची प्रतिमा उजळवण्याच्या नादात महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या या प्रयत्नांबाबत जनमानसात नाराजी व्यक्त केली जात आहे.