सेवानिवृत्त अधिकार्‍याची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

भारतीय हवाई दलाच्या सेवानिवृत्त अधिकार्‍याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफ्याऐवजी फसवणुकीला तोंड द्यावे लागले आहे. या अधिकार्‍याची तब्बल 40 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

तळोजा भागात राहणार्‍या या सेवानिवृत्त अधिकार्‍याने 29 डिसेंबर रोजी सोशल मिडीयावर ट्रेडिंग शेअर मार्केटची जाहिरात पाहिली. त्यातील चांगला नफा मिळवून देण्याच्या आश्‍वासनामुळे त्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी त्यांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामील करून घेण्यात आले. या ग्रूपमध्ये सायबरचोरांनी शेअर मार्केटमधील नफ्याबद्दल माहिती सांगून एक अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार या अधिकार्‍याने मागील महिन्यात 40 लाख 75 हजार रुपये गुंतवले. या रकमेवर त्यांना तब्बल 2 कोटी 84 लाख 37 हजार रुपये इतका नफा मिळाल्याचे त्या अ‍ॅपवर दिसत होते. ही रक्कम आपल्याला मिळावी, यासाठी त्यांनी ग्रुपच्या सदस्यांना सांगितले. मात्र, त्यासाठी 20 टक्के कमिशन म्हणून 29 लाख 77 हजार 528 हजार रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. इतकी रक्कम नसल्याचे त्यांनी सांगताच, पैसे भरल्याशिवाय नफ्याची रक्कम मिळणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. सायबरचोरांकडून वारंवार व्हॉट्सअ‍ॅपवर हा मेसेज दिला जात असल्याचे पाहून आपली फसवणूक झाल्याचे या अधिकार्‍याच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी एनसीसीआरपी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी सोमवारी नवी मुंबई सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Exit mobile version