पनवेलमधील आयडीबीआय बँकेला 33 लाखाला गंडा

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलमधील आयडीबीआय बँकेला अज्ञात सायबर गुन्हेगारांनी तब्बल 33 लाख 29 हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार उघडकिस आल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी बँकेने दिलेल्या तक्रारीवरुन सायबर गुन्हेगारांच्या टोळी विरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच या टोळीचा शोध सुरु केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार शिल्पी अगरवाल या पनवेल मधील आयडीबीआय बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत असून गत 12 जुलै रोजी त्या बँकेत असताना, एका सायबर गुन्हेगाराने बँकेतील खातेदार इकबाल काझी असल्याचे भासवून त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला होता. तसेच त्याचे चेकबुक संपल्याचे व वैद्यकीय कारणासाठी त्याला तात्काळ काही रक्कम ट्रान्स्फर करायचे असल्याबाबत सांगितले. तसेच त्याचे बँकेतील मॅनेजर टिना बासु यांच्यासोबत बोलणे झाल्याचे व 1 कोटी रुपयांची एफडी करण्यासाठी तो सायंकाळी बँकेत येणार असल्याचे सांगून त्याने शिल्पी अगरवाल यांचा विश्‍वास संपादन केला. यावर शिल्पी अगरवाल यांनी त्याला त्यांच्या लेटरडेवर रिक्वेस्ट लेटर पाठवून देण्यास सांगितले.

त्यानुसार सायबर गुन्हेगाराने इकबाल काझी यांच्या कंपनीच्या नावाच्या लेटरहेडवर डायरेक्टरच्या सहीचे पत्र बँकेच्या ईमेल आयडीवर पाठवून दिले. सदर पत्रामध्ये अमर चौहान, सुमित, अतुलकुमार व शहारुख खान या चौघांच्या बँक खात्याची माहिती व त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवून देण्याबाबत सांगण्यात आले असल्यामुळे बँकेच्या मॅनेजर शिल्पी अगरवाल यांनी सदर पत्र कंपनीकडून आल्याचे समजून त्यात दिलेल्या माहितीनुसार चार व्यक्तींच्या खात्यामध्ये आरटीजीएसद्वारे तब्बल 33 लाख 29 हजाराची रक्कम पाठवून दिली. त्यानंतर सायबर गुन्हेगाराने मागणी केल्यानुसार शिल्पी अगरवाल यांनी सदर व्यवहाराच्या युटीआय नंबर त्याच्या व्हॉट्सऍप व ईमेलवर पाठवू दिले.

दरम्यान, इकरा स्टील टयुब्स प्रा.लि या कपंनीच्या बँक खात्यातून 33 लाख 29 हजाराची रक्कम परस्पर वळती झाल्याची माहिती कंपनीचे डायरेक्टर इकबाल काझी यांना मेसेजद्वारे मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ बँकेत संपर्क साघून सदरचे व्यवहार त्यांनी केले नसल्याचे व सदर व्यवहार थांबविण्यास सांगितले. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी इकरा स्टील टयुब्स प्रा.लि. या कंपनीच्या डायरेक्टरच्या सहीचा व लेटरहेडचा वापर करुन फसवणुक केल्याचे शिल्पी अगरवाल यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे गाठुन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सायबर गुन्हेगांराच्या टोळीवर फसवणुकिचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

Exit mobile version