25 लाखाच्या लॉटरीसाठी साडे सतरा लाखाची फसवणूक

अलिबाग-म्हात्रोली येथील महिलेला घातला गंडा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

25 लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे सांगत पैसे मिळवण्यासाठी फोन पे, गुगल पे वरून कधी 50 हजार तर कधी 1 लाख असे भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे अलिबाग तालुक्यातील म्हात्रोली येथील महिलेकडून तीन महिन्यांत वेगवेगळ्या माध्यमातून 17 लाख 52 हजार रुपये उकळले. तरी देखील लॉटरीचे 25 लाख रुपये न देणार्‍या अज्ञात आरोपी विरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 25 मार्च 2021 ते दि. 11 मे 2021 दरम्यान अज्ञात आरोपीने म्हात्रोळी येथील महिला फिर्यादी यांना 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवले. लॉटरीचे पैसे वटविण्याकरीता वेगवेगळी कारणे सांगुन वेगवेगळया मोबाईल नंबरवरून व्हॉटसप कॉल केला. तसेच फिर्यादीकडुन वेळोवेळी पैशाची मागणी केली.

त्यानुसार फिर्यादी यांनी मोबाईलवरून गुगल पे व फोन पे द्वारे कधी 50 हजार-तर कधी 1 लाख असे एकुण 17 लाख 52 हजार रूपये गुगल पे व फोन पे अकाऊंटवर पाठविले. मात्र पाच महिने उलटून गेले तरी लॉटरीचे पैसे पाठविले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्या महिलेने मांडवा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे हे करीत आहेत.

Exit mobile version