पार्टटाइम जॉबच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

पार्टटाईम जॉबद्वारे पैसे कमावण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला टास्क फ्रॉडमध्ये अडकवून त्याला वेगवेगळ्या यूपीआय आयडीवर व कंपन्यांच्या नावावर तब्बल नऊ लाख 66 हजार रुपये पाठवण्यास भाग पाडून त्याची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. खारघर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणात फसवणूक झालेला 23 वर्षीय तरुण मूळचा तेलंगणा राज्यातील असून, शिक्षणानिमित्त तो सध्या खारघर येथे मित्रासह राहण्यास आहे. गत मे महिन्यामध्ये या तरुणाला सायबर चोरट्यांनी टेलीग्रामवर एक लिंक पाठवून साईड बाय साईड त्यांच्या सोबत काम केल्यास त्याला चांगले पैसे मिळतील, असा मेसेज पाठवला होता. त्यामुळे सायबर चोरट्यांनी पाठवलेली लिंक या विद्यार्थ्याने ओपन केली असता, व्हिडीओला लाईक केल्यानंतर त्याला डबल पैसे मिळतील, अशी माहिती त्याद्वारे त्याला देण्यात आली. या आमिषाला बळी पडून या विद्यार्थ्याने त्यास होकार दिल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्याला त्याच्या टास्क ग्रुपमध्ये सामील करून घेतले. त्यानंतर त्याला टास्कमध्ये काही पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार या विद्यार्थ्याने सायबर चोरट्यांनी दिलेल्या पाच-सहा कंपन्यांच्या नावाने 80 हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन पाठवली. मात्र, ही रक्कम सोडवण्यासाठी सायबर चोरट्यांनी त्याच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. सदर रक्कम दिल्यास आपली रक्कम परत मिळेल, या आशेने या विद्यार्थ्याने आणखी 20 हजार रुपये पाठवले. त्यानंतर या विद्यार्थ्याने आपले पैसे परत मागितले असता, सायबर चोरट्यांनी त्याला त्याची रक्कम परत मिळवण्यासाठी आणखी काही पैशांची मागणी केली. त्यामुळे त्याने आणखी 10 हजार रुपये पाठवून दिले. अशा पद्धतीने सायबर चोरट्यांनी या विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या यूपीआय आयडीवर व कंपनीच्या नावाने तब्बल नऊ लाख 66 हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले. मात्र, त्याबदल्यात सायबर चोरट्यांनी या विद्यार्थ्याला काहीही न देता, त्याची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने खारघर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.

Exit mobile version