सोन्याचा खोटा गुच्छ देत दहा लाखांची फसवणूक

। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
खोटा सोन्याच्या हाराचा गुच्छ देऊन दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. आरोपीविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लुईस कोलासो यांचे नेत्रप्रभा बिल्डींग, छत्रपती शिवाजी महाराज रोड, लाईन आळी येथे नीक ऑप्टिशियन नावाने चष्म्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात राजू नावाचा इसम हा दोन-तीन वेळा चष्मा विकत घेण्यासाठी आला होता. त्यानंतर राजू परत दुकानात आला. व त्याच्याकडे काही सोने आहे त्याला विकायचे असे सांगितले. पैशाची लवकरात लवकर गरज असल्याने त्यांना सोने विकत घेणार का असे त्यांना विचारले. यावेळी लुईस यांनी होकार दिला. राजू याने दुसर्‍या दिवशी सोन्याच्या हाराचा गुच्छ आणला व त्यातील सोन्याचे मणी काढून ते तपासणीसाठी सांगितले. ते मणी खरे असल्याचे सोनाराने सांगितले. त्यानंतर लुईस सोन्याच्या हाराचा गुच्छ घेण्यास तयार झाले. यावेळी कामोठे सेक्टर 22 येथील बालाजी स्वीट समोर दहा लाख रुपये राजूला दिले व त्याच्याकडून सोन्याच्या हाराच्या गुच्छ घेतला.
दुसर्‍या दिवशी सोन्याच्या हाराचा गुच्छ घेऊन सोनाराकडे जाऊन तपासले असता सोन्याच्या गुच्छा खोटा असल्याचे समजले. त्यानंतर राजूला फोन केला असता त्याचा फोन लावला नाही. राजू विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version