सोन्याची बिस्कीटे कमी किंमतीत देण्याच्या बहाण्याने फसवणूक

| माणगाव | प्रतिनिधी |

बाजार भावापेक्षा कमी किंमतीत सोन्याची बिस्किटे देतो असे सांगत एका अंध व्यक्तीची 3 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा 11 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास इंदापूर गावात घडला होता. या गुन्ह्याची फिर्याद गोविंद देवसीभाई महालिया (वय-30) रा.वडाळा ईस्ट मुंबई यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिल्यावर या गुन्ह्याची नोंद 18 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

गोविंद देवसीभाई महालिया हे जन्मतः अंध असून यांतील नौशाद नाईक रा.इंदापूर ता.माणगाव याने फिर्यादी यांना बाजाराच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीमध्ये सोन्याची बिस्कीट देतो असे सांगून त्यांना इंदापूर ता.माणगाव याठिकाणी बोलावून घेतले. तेथे झाकीर व एक अज्ञात (नाव गाव माहित नाही) यांनी फिर्यादी यांच्याकडून 3 लाख 20 हजार इतके रुपये घेऊन त्यांना सोन्याची बिस्किटे न देता संगनमत करून फसवणूक केली. या गुन्ह्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर हे करीत आहेत.

Exit mobile version