दागिने सोडविण्याच्या बहाण्याने गंडा

| पनवेल । वार्ताहर ।

तारण ठेवलेले दागिने सोडवण्याच्या बहाण्याने एका भामट्याने खारघरमधील एका सोनाराची तब्बल 11 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खारघर पोलिसांनी एकावर फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

खारघर मध्ये राहणार्‍या राजेश ओस्तवाल (39) यांचे खारघर सेक्टर-13 मध्ये राजलक्ष्मी ज्वेलर्स नावाने दुकान आहे. 21 ऑक्टोबर रोजी अब्दुल मजीद खान नामक व्यक्तीने ओस्तवाल यांच्या दुकानातील कामगार अर्जुन सिंग दसाना याला संपर्क साधून सीबीडी बेलापूर येथे सोने तारण ठेवल्याचे सांगितले होते. तसेच ते दागिने सोडवण्यासाठी तीन लाखांची गरज असल्याचे सांगितले होते. त्यावेळी अर्जुन सिंग याने खात्री करून 2 लाख 45 हजार रुपये भरले होते. त्यानंतर पुन्हा 22 ऑक्टोबर रोजी अब्दुल खान याने पुन्हा अर्जुन दसाना याला संपर्क साधून आणखी एका बँकेत सोने तारण ठेवल्याचे सांगत 11 लाख रुपये हवे असल्याचे सांगितले. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर दागिने बनवल्याच्या पावत्या पाठवून पैसे भरल्यानंतर ते दागिने ओस्तवाल यांना विकणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ओस्तवाल यांनी पुन्हा अब्दुल खान याच्या बँक खात्यात 11 लाख रुपये पाठवून दिले होते. पण त्यानंतर अब्दुल खान दागिने देण्यात टाळाटाळ करू लागल्याने अखेर याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version