| पनवेल | वार्ताहर |
विदेशात नोकरीला लावतो असे सांगून दोघांकडून सहा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी अब्दुल लतीफ शेख, रा. तळोजा यांच्या विरोधात तळोजा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद मस्तान अजीम सय्यद रा. तळोजा याचे भाचे अदनान समी आणि गुफरान समी नोकरीच्या शोधात होते. त्यांना अब्दुल लतीफ हा परदेशात नोकरी लावून देतो, असे समजले. त्याच्याशी ओळख करून दिली असता, त्याने विदेशात नोकरी व व्हिसासाठी 15 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तसेच ॲडव्हान्स म्हणून 10 लाखांची मागणी केली. अखेर सहा लाखांमध्ये काम करण्याचे ठरले. यावेळी आधी साडेतीन लाख रुपये आणि नंतर अडीच लाख रुपये देण्यात आले. काही दिवसांनी नोकरीसाठी दिल्लीला जात आहे, असे सांगून अब्दुल लतीफ निघून गेला. मात्र, अब्दुल लतीफशी संपर्क साधला असता, फोन बंद येत होता. अखेर तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
