| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौल येथे मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर नुकतेच संपन्न झाले. या नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास गरजूंचा मोठा प्रतिसाद लाभला. चौल चंपावती मंदिरात श्री सत्यसाई संघटना मुंबई मेट्रो प्रदेश महाराष्ट्र आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या विद्यमाने शुक्रवार, दि.6 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोफत नेत्र व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले.
चौल येथे श्री सत्यसाई संघटना, मुुंबई मेट्रो प्रदेश यांनी विविध खेडेगावात 14 वेळा सलग नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये एकूण 130 जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. यामध्ये वीस जणांना मोतिंबिंदू शस्त्रक्रियेसाठी रूग्ण मिळाले आहेत. यामध्ये एकूण 1600 पेक्षा जास्त रूग्णांची डोळे तपासणी व 300 पेक्षा जास्त रूग्णांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती श्री सत्यसाई संघटनेचे सुरेश मेहेर यांनी दिली.
या मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु तपासणी शिबिरास श्री सत्यसाई संघटनेचे पदाधिकारी व सेवक यांच्यासह चंपावती मित्रमंडळाचे जितेश नागवेकर, रवींद्र महाले, ॠग्वेद जोशी, जयवंत नागवेकर, सिद्धेश जाधव, मनोज नाईक, मधुकर सावंत, संदीप घरत यांनी परिश्रम घेतले.