माणगावमध्ये 120 जणांची मोफत नेत्रतपासणी

36 रुग्णांवर शस्त्रक्रिया


माणगाव, प्रतिनिधी

माणगावात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व तालुक्यातील उद्योजक विजयशेठ चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे नेत्रतपासणी शिबीर बुधवार, दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत वृत्तपत्र विक्रेते बाळकृष्ण मेथा यांचे हॉल जुने एसटी स्टॅंडजवळ माणगाव याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शंकरा आय हॉस्पिटलचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी 120 रुग्णांची तपासणी करून 36 नेत्ररुग्णांना पनवेल येथे नेऊन त्यांच्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

माणगावात गेली सात ते आठ महिन्यांपासून शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व माणगाव येथील प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विजयशेठ मेथा यांच्यावतीने मोफत नेत्ररोग व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरात आतापर्यंत 900 हुन अधिक नेत्ररुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गोरगरीब जनतेला दृष्टी मिळून जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून यापुढेही आपण हे शिबीर राबविणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले.

शिबीर आयोजित करण्यासाठी महेंद्र मेथा यांनी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मेथा परिवारातर्फे विजयशेठ मेथा, मनीष मेथा, विधिता मेथा यांनी आभार व्यक्त केले. शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विजय मेथा, तनुजा हेमंत मेथा, छाया मेथा, विधिता मेथा, मनीष मेथा, सुप्रिया शिंदे यांच्यासह शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेलचे टीम व्यवस्थापक प्रकाश पाटील व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य करीत परिश्रम घेतले. सदर शिबीर हे दर महिन्यातील एका बुधवारी आयोजित करण्यात येत असल्याने या शिबिराचा लाभ बहुजन समाजातील गरीब गरजू नेत्र रुग्णांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन उद्योजक विजय मेथा यांनी केले आहे.

Exit mobile version