। रसायनी । प्रतिनिधी ।
हुमाना पीपल टू पीपल इंडिया आणि मर्क स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोपाडा नवीन पोसरीतील हनुमान मंदिराच्या सभागृहात परिसरात भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि तपासणीसाठी राबवण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, स्तन तपासणी, सिकलसेल तपासणी तसेच गर्भाशय मुखाचा कर्करोग याची तपासणी करण्यात आली. तसेच तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन देण्यात आले.
या उपक्रमात डॉ. तृप्ती पोयरेकर (स्त्री रोग तज्ञ व प्रसुती तज्ञ) आणि डॉ. प्राची जोशी (स्त्री रोग तज्ञ व प्रसुतीतज्ञ) यांनी सविस्तर तपासणी करून योग्य वैद्यकीय सल्ला दिला. प्रोजेक्ट लीडर पिंटू कुमार शर्मा, हेल्थ एक्सिलेटर मनीषा गणेश खंडागळे, कम्युनिटी मोबिलायझर तनिष्का तुळशीदास कर्णेकर आणि एमआयएस ऑपरेटर अर्णव गांगुली, हुमानाचे माजी कर्मचारी प्रवीण पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी ग्रुप ग्रामपंचायत वासांबे सरपंच उमा मुंढे, संदिप मुंढे, ग्रामपंचायत सदस्या रसिका राकेश खराडे, सदस्या प्रतीक्षा राऊत, सदस्या वेदिका पाटील, सदस्या मयुरा गोपाळे, वर्षा पाटील, सारिका कांबळे, उज्वला शेंडकर, मयुरी गोपाळे, नीलीमा पाटील, सुनिता पाटील, सुप्रिया खारकर, पूर्वा खाने व ममता काळोखे, प्रियंका तेलंगे, राजेश जगताप आदी उपस्थित होते.
हुमाना पीपल टू पीपल इंडिया आणि मर्क स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विद्यमाने गेल्या दीड वर्षापासून आरोग्य जनजागृतीचे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. प्रकल्प निरामया मुंबई पाताळगंगा अंतर्गत महिलांचे व किशोरवयीन मुलींचे आरोग्य गट तयार करून दरमहा प्रशिक्षण, गृहभेटी, जनजागृती रॅली, मोफत सॅनिटरी पॅड वाटप करणे, शाळा कॉलेजमध्ये मुलींसाठी आरोग्य प्रशिक्षण सत्र घेणे, असे उपक्रम राबविले जात आहेत. या शिबिरामुळे आरोग्याबाबत जागरूकता असले पाहिजे व भविष्यातही अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.





