श्रीवर्धन आगारात घोड्यांचा मुक्त संचार

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन येथील बसस्थानक परिसरात मोकाट घोडे व गुरांचा मुक्त संचार प्रवासीवर्गाला त्रासदायक ठरत आहे. एसटी चालकालाही बसस्थानकातून गाडी बाहेर काढताना मोठी कसरत करीत गाडी मार्गस्थ करावी लागते.

बसस्थानकाचे प्रशस्त आवार, प्रवेशद्वार, चारही फलाट तर अनेकदा बसस्थानक इमारतीतील वाहतूक नियंत्रण कक्ष, हिरकणी कक्ष, उपहारगृह या परिसरात घोडे, गुरांचा मुक्त संचार असल्याने प्रवासीवर्ग भयभीत होतो. अनेकदा बसस्थानकातील ऑन ड्युटी असलेले कर्मचारी घोडे, गुरांना हाकलताना दिसतात. बहुतेक वेळा नैसर्गिक विधी ही बसस्थानकाच्या इमारतीत हे प्राणी उरकत असल्याने त्या परिसरात दुर्गंधी पसरते. याचा त्रास एसटी कर्मचारी व प्रवासीवर्गाला सहन करावा लागतोय.

एसटी बसस्थानकातून मार्गस्थ होत असतानाही गुराढोरे व घोड्यांचा मार्गात वावर असल्याने अनेकदा चालकाला गाडी बंद करीत ढोरांना हुसकावून देण्याची अगोदर ड्युटी करावी लागते.या कारणाने फलाटावरुन वेळेत सुटलेली गाडी बसस्थानकाच्या फाटकाजवळ अनेक वेळ रखडते.

Exit mobile version