इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत टोलमाफी
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील प्रमुख महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल आकारला जाणार नाही, असा निर्णय 29 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. या निर्णयाची अंबलबजावणी शुक्रवारपासून केली जाणार आहे. आजपासून अटल सेतूवरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही. तसेच, पुढील दोन दिवसांत मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्गावरही अशा प्रकारची टोलमाफी केली जाणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांसाठीची ही टोल माफी राज्य सरकारकडून वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन, प्रदूषणकारी वायू आणि हरितगृह वायू उत्सर्जन रोखण्यासाठी एप्रिल महिन्यात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर करण्यात आले. अटल सेतूवरून दररोज अंदाजे 60 हजार वाहनं प्रवास करतात. त्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणाला आळा बसावा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी राज्य सरकारने 2030 पर्यंत राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. अटल सेतूवर चारचाकी वाहनाला 250 रूपयांचा टोल आहे. इलेक्टिक वाहनांना हा टोल द्यावा लागणार नाही.
अटल सेतूवर टोल माफीसाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून शुक्रवार (दि. 22) पासून सुरू करण्यात येणार आहे. अन्य दोन महामार्गावरही दोन दिवसांत ही सुविधा सुरू होणार आहे.
– विवेक भिमनवर, परिवहन आयुक्त







