शेतकरी कामगार पक्षामार्फत उद्यापासून मोफत लसीकरण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनाची साखळी मोडायची असेल तर जास्तीत जास्त लसीकरण होणे गरजेचे आहे. आपला अलिबाग तालुका लवकरात लवकर कोविडमुक्त व्हावा यासाठी शेतकरी कामगार पक्षामार्फत मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर लसीकरण मोहिमेला बुधवार दि. 1 सप्टेंबर पासून तोडकरी हॉस्पिटल येथे सुरुवात होणार आहे. या लसिकरण मोहिमेत गावानुसारच लस देण्यात येणार असल्याने त्यानुसार संपर्क साधुन नाव नोंदणी करण्याचे आवाहन शेकापक्ष महिला आघाडी प्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.

यासंदर्भात चित्रलेखा पाटील यांनी जनतेशी संवाद साधताना म्हटले आहे की, कोव्हीडची लाट जरी ओसरत असली तरी आपल्या सर्वानांचा कोव्हीड प्रतिबंधक लस घ्यायची आहे. मात्र भारतात कोव्हीड प्रतिबंधक लसीचा प्रचंड तुटवडा आहे. त्याचप्रमाणे अलिबाग तालुक्यात देखील हा तुटवडा जाणवतो आहे. रायगड जिल्हा आणि अलिबाग तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. त्यासाठी शेकापक्षाच्या वतीने आम्ही तोडकरी हॉस्पिटलला लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रावर 1 सप्टेंबर पासून आपण जनतेसाठी मोफत लसीकरण सुरु करणार आहोत. त्याचे नियोजन करताना हे लसीकरण ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. रोज 100 लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

एका दिवसाला एक गाव निवडण्यात येणार आहे. प्रत्येक गावाला प्रतिनीधी नियुक्त करण्यात आला असून त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर लाभार्थ्यांना डोस मिळणार आहे. त्याचबरोबर मोफत बससेवा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पीएनपीच्या बस गावा गावात येऊन लाभार्थ्यांना तोडकरी लसीकरण केंद्रावर घेऊन येतील आणि लसीकरण पुर्ण करतील. हा उपक्रम दोन तीन महिने सुरु ठेवण्याचा मानस आहे. लस घेतल्यानंतर देखील कोराना होऊ शकतो मात्र त्याची तीव्रता कमी होऊन निश्‍चितच जिव वाचू शकतो असा विश्‍वास व्यक्त करीत चित्रलेखा पाटील यांनी प्रत्येकाने शिस्तपध्दतीने या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Exit mobile version