| नेरळ | प्रतिनिधी |
राज्यात सरकार असलेल्या शिवसेना भाजप युतीने स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. ती यात्रा कर्जत विधानसभा मतदार संघात काढण्यात येणार असून, चार आणि पाच एप्रिल रोजी ही यात्रा प्रमुख शहरात आणि ग्रामीण भागात फिरणार आहे. याबद्दल युतीच्या कार्यकर्त्यांनी नियोजन सभा घेऊन सावरकर गौरव यात्रा मोठ्या उत्साहात करण्याचे नियोजन केले आहे.
या गौरव यात्रेसाठी कर्जत विधानसभा मतदारसंघातील नियोजनाची आढावा बैठक आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कर्जत पोसरी येथील सुरभी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी आमदार थोरवे यांच्यासह शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील, जेष्ठ कार्यकर्ते संतोष भोईर, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, मतदारसंघ संघटक शिवराम बदे, संपर्क प्रमुख पंकज पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, तसेच किसान मोर्चाचे सुनील गोगटे, कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अनंत धुळे आदी मान्यवर उपस्थित होते.