फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा; श्‍वीऑटेकचा संघर्षपूर्ण विजय

। पॅरिस। वृत्तसंस्था ।

अग्रमानांकित इगा श्‍वीऑटेकने जपानच्या नाओमी ओसाकावर संघर्षपूर्ण विजय मिळवताना फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. महिलांमध्ये दुसर्‍या मानांकित अरिना सबालेन्का आणि कझाकस्तानच्या एलिना रायबाकिनाने, तर पुरुषांमध्ये इटलीचा यानिक सिन्नेर आणि पाचवा मानांकित डॅनिल मेदवेदेव यांनीही तिसर्‍या फेरीतील स्थान निश्‍चित केले.

जेतेपदासाठी प्रमुख दावेदार असणार्‍या पोलंडच्या श्‍वीऑटेकने माजी ग्रँडस्लॅम विजेत्या ओसाकावर 7-6 (7-1), 1-6, 7-5 असा विजय मिळवला. सामन्यातील पहिला सेट श्‍वीऑटेकने जिंकला, पण तिला संघर्ष करावा लागला. दुसर्‍या सेटमध्ये ओसाकाने सहज बाजी मारत सामना बरोबरीत आणला. तिसर्‍या सेटमध्येही ओसाकाने वर्चस्व मिळवले होते. तिच्याकडे 5-2 अशी मोठी आघाडी होती. मात्र, यावेळी श्‍वीऑटेकने सलग पाच गेम जिंकत सामना आपल्या नावे केला. सबालेन्काने जपानच्या मोयुका उचिजिमाला 6-2, 6-2 असे सरळ सेटमध्ये नमवत आगेकूच केली. माजी विम्बल्डन विजेत्या रायबाकिनाने नेदरलँड्सच्या अरांतक्सा रसला 6-3, 6-3 असे सरळ सेटमध्ये नमवत तिसर्‍या फेरीत धडक मारली. पुरुष एकेरीत सिन्नेरने फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केवर 6-4, 6-2, 6-4 असा विजय मिळवला. मेदवेदेवला मिओमिर केचमानोविचविरुद्ध पुढे चाल मिळाली. मेदवेदेव 6-1, 5-0 असा आघाडीवर असताना मिओमिरने सामना मध्येच सोडला. अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेवने डेव्हिड गॉफिनवर 7-6 (7-4), 6-2, 6-2 असा विजय साकारला.

Exit mobile version