डोंगरपट्टीतील ग्रामस्थ भयभीत; शासन मात्र गाढ झोपेत!
| पाली/वाघोशी | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील महागाव, चंदरगाव, कळकराई, भोप्यांचीवाडी, खांडपोली, वाघोशी, देऊळवाडी, कोंडप, कवेळेवाडी आदी गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार जमिनीला जबरदस्त हादरे बसत असून ग्रामस्थ दहशतीत दिवस काढत आहेत. शासनाकडून मात्र याबाबत कुठलीही ठोस हालचाल न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.
सहा महिन्यापूर्वी या भागाला मोठे हादरे बसले होते. त्यानंतर 12 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरपर्यंत दररोजच जमिनीला हादरे बसत आहेत. या सततच्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ प्रशासनाकडे वारंवार धाव घेत आहेत.
तहसीलदार कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयाला व त्यांच्याकडून भूगर्भ तज्ञांकडे पत्रव्यवहार झाल्याचे सांगण्यात येत असले तरी भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण विभाग, पुणे यांनी आजवर गावांची पाहणीसुद्धा केली नाही, हे धक्कादायक वास्तव ग्रामस्थांच्या चिंतेत भर घालणारे आहे. त्यामुळे भविष्यात मोठा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, डोंगरपट्टी विभागातील सामाजिक कार्यकर्ते भास्कर पार्टे यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन नायब तहसीलदारांच्या समोर ग्रामस्थांच्या अडचणी मांडल्या. त्यानंतर त्यांनी भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करताना आमच्या विभागात हजारो लोक राहतात, त्यांच्या जीवाची काळजी घ्या. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन छेडावं लागेल, असा इशारा दिला.
अन्यथा परिणामांची जबाबदारी प्रशासनावर
भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण विभागाने तातडीने या गावांमध्ये येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि खऱ्या परिस्थितीचा अहवाल द्यावा. शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास भीषण परिणामांची जबाबदारी थेट प्रशासनावर राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
