उरणमध्ये विजेचा खेळखंडोबा

शासकीय कार्यालये, बँकांच्या कामकाजावर परिणाम; नागरिकांसह व्यावसायिकही त्रस्त

| उरण | वार्ताहर |

उरण शहर तसेच अनेक गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, विजेच्या या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच शासकीय कार्यालये तसेच बँकांच्या कामकाजावरही परिणाम जाणवू लागला आहे. तर, व्यवसाय उद्योजकही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी उरणच्या नागरिकांकडून केली जात आहे.

सुरुवातीच्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना ही नित्याची असली तरी पावसाळा सुरू होऊन तीन ते चार महिने लोटल्यानंतरही उरणमधील नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने तहसील, पोलीस ठाणे, बँका, झेरॉक्स दुकाने येथील कामकाजावर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे कार्यालयातील कर्मचार्‍यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.

महावितरणकडून विद्युत ग्राहकांना चोविस तास वीज उपलब्ध व्हावी, अशी नागरिकांना अपेक्षा असते. परंतु, शहरात व तालुक्यात वेळीअवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहकांचा मागील काही दिवसांपासून अपेक्षाभंग होत आहे. मात्र, याकडे महावितरणच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे, तर दुसरीकडे वीज बिलाची मात्र सुलतानी वसुली सुरू असल्याचे बोलले जात आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. तर काही दिवसात नवरात्रोत्सवही साजरा होणार आहे. या सण, उत्सवात विजेचा असा खेळखंडोबा सुरू राहिला, तर नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. एखाद्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर शहरात व तालुक्यात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने शहरात व तालुक्यात वीज पुरवठा खंडित होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेकडून होत आहे.

मान्सूनपूर्व कामांचा उडाला फज्जा
महावितरणकडून दरवर्षी मान्सूनपूर्व मेंटेनन्सची कामे केली जातात. परंतु, ही कामे केल्यानंतरही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतच असतात. त्यामुळे महावितरण विभागाकडून मान्सूनपूर्व मेंटेनन्सची केली जाणारे कामे ही कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. मान्सूनपूर्व मेंटेनन्स कामांची वरिष्ठ अभियंत्यांकडून चौकशी होणे गरजेचे आहे. चोवीस तास वीजपुरवठा करण्यात महावितरणला अपयश येत असले तरी थकीत वीज बिल वसुलीकडे मात्र शंभर टक्के लक्ष असल्याचे दिसून येत आहे. यामुळे काहींची मौल्यवान विद्युत उपकरणे जळाली आहेत.

Exit mobile version