नागोठण्यात विजेचा लपंडाव

। सुकेळी । वार्ताहर ।

अद्याप पावसाने पाहीजेत तशी सुरूवात केली नसतानासुद्धा सततच्या वारंवार होणार्‍या विजेच्या लपंडावामुळे नागोठणेसह वाकण, सुकेळी, बाळसई परिसरातील नागरीक हैराण झाले आहेत. जुलै महिना सुरु झाला तरीसुद्धा वातावरणात उष्णता ही वाढतच असल्यामुळे पंखे, वातानुकुलीत यंत्राचा वापर वाढलेला असतानाच वीज अनेकवेळा नसल्याने उकाड्यामुळे नागरीकांचा जीव कासावीस होत आहे. वीज कधी येणार यासंबंधीत अनेक वेळा फोन करुनसुद्धा महावितरणचे कर्मचारी फोन उचलत नाहीत. तर कधी फोन नॉट रिचेबल येत असल्यामुळे महावितरणच्या या गळथान कारभाराबाबत परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच, विजेचा वारंवार लपंडाव सुरू असल्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. तर, याचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांनादेखील बसत आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील लघुउद्योजकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान, वीज बिले भरुन घेण्यासाठी महाविरणाकडून मोठी तत्परता दाखवली जाते. अशीच तत्परता जर का वीज खंडीत झाल्यानंतर ती सुरळीत करण्यासाठी का दाखवली जात नाही, असा प्रश्‍नही उपस्थित करुन महावितरणचे अभियंता व कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यास स्पेशल अपयशी ठरल्याची टीकाही विभागातील नागरीकांकडून करण्यात येत आहे.

मी वाकण या ठिकाणी एक छोटासा हॉटेलचा व्यवसाय करत असून सध्या सुरू असलेल्या वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे माझे हॉटेलमधील अनेक वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे याचा मोठा फटका मला माझ्या व्यवसायामध्ये बसत आहे.

दिपक भगत, व्यावसायिक, वाकण
Exit mobile version