फ्रेया डेव्हिएसचा निवृत्तीचा निर्णय


| इंग्लंड | वृत्तसंस्था |

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा वर्षांपूर्वी पदार्पण करणारी इंग्लंडची गोलंदाज फ्रेया डेव्हिएसने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. 29 वर्षीय फ्रेयाला वकिल बनायचे आहे आणि त्यासाठीच तिने 15 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दिला अखेर रामराम केला आहे. तिने 35 सामन्यांत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि तिला आता वकिल बनायचे आहे. तिला भविष्यासाठी शुभेच्छा, अशी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

जलदगती गोलंदाज असलेल्या डेव्हिएसने 2019 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यातून पदार्पण केले होते. तिने 26 टी-20 सामन्यांत 23 बळी घेतले आहेत. डिसेंबर 2019 मध्ये ती पहिली एकदिवसीय सामना खेळली होती. त्यानंतर 9 सामन्यांत 10 बळी तिने घेतले आहेत. वयाच्या 14 व्या वर्षी तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि 2010 मध्ये तिने ससेक्स कौंटी क्रिकेट क्लबकडून पदार्पण केले. त्यानंतर 2012 मध्ये तिने क्लबसाठी पहिला एकदिवसीय सामना खेळला. 2013 मध्ये कौंटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकणाऱ्या ससेक्स संघाची ती सदस्य होती. तिने या क्लबसोबत 86 सामने खेळले आहेत. दी हंड्रेड लीगमध्ये पाच हंगामात लंडन स्पिरिट व वेल्श फायर या दोन संघाचे प्रतिनिधित्व करताना 37 सामन्यांत तिने 36 बळी घेतले आहेत.

Exit mobile version