| पोलादपूर | प्रतिनिधी |
दाक्षिणात्य राज्यातील लोकप्रिय जलिकट्टूचा खेळ आणि युरोपियन देशात बुलफाईटचा मर्दानी खेळ सर्वांनाच ज्ञात असताना पोलादपूरच्या ग्रामीण भागात बैलदिवाळीच्या पारंपरिक मर्दानी खेळाचे आकर्षण चाकरमानी आणि स्थानिकांमध्ये आजही कायम आहे. देवदिवाळीपासून म्हणजेच मार्गशीर्ष प्रतिपदेपासून साखर येथे बैलदिवाळी साजरी करण्यात आली. आता गावागावात बैलदिवाळीचा थरार अनुभवण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे येणार आहेत.
पोलादपूर तालुक्याच्या कापडे ते कामथे रस्त्यापासून आतील गावागावात जपलेली ही बैलदिवाळीची परंपरा शेतकऱ्यांना उपयुक्त असलेल्या मुक्या जनावरातील मरगळ म्हणजेच अकड दूर करण्याचा प्रयत्न असून, चौखूर उधळणे, शिंगं रोखणे आणि वारा पिऊन बेभान होण्याचे पिसाटल्यागत वर्तन या बैलदिवाळीनंतर बैलांमध्ये शिल्लक राहात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दिवाळीनंतर देवदिवाळी आली की, ग्रामदैवतांचा कौल घेऊन, देणं देऊन यंदा मार्गशीर्ष प्रतिपदेच्या दिवशी बैलदिवाळीची प्रथा सुरु झाली. पोलादपूर तालुक्यातील बोरज, साखर, लहुळसे, आडावळे खुर्द, आडावळे बुद्रुक, एरंडवाडी, ऊमरठ, मोरसडे गावच्या बारा वाड्या, बोरघर, कामथे, गोवेले, साळवीकोंड आणि अन्य गावांतही दुपारी बैलदिवाळी मोठया जल्लोषात साजरी करण्यात येत असते.
शेतातील मळणी आणि अन्य कामातून शेतकरी मोकळा झाला असून, त्याची सर्जा-राजाची बैलजोडी त्याआधीच शेतीच्या कामातून मोकळी होऊन खूप दिवस गोठ्यात चारापाणी खाणारी असल्याने बैलाच्या अंगात आलेली अकड काढण्यासाठी हा बैलदिवाळीचा उत्सव देवदिवाळीला साजरा केला जातो. यावेळी बैलाला सजवून त्याच्या शिंगांना झुपकेदार तुरे लावून आकर्षक बनविले जाते. बैलाची वेसण ओढली की तो पुढच्या पायावर झुकून उडी मारतो. असे अनेकदा केले की बैल नाचतोय असे वाटू लागते. या नाचणाऱ्या बैलाचे उधळणे झाले की, ग्रामस्थ त्याच्याभोवती काठ्या घेऊन फिरतात. या काठयांच्या टोकाला बकरीच्या अंगावरील केसांच्या झुपक्यांसह चामडे असते. यामुळे या बैलाला शिंकेची भावना होऊन तो मान जोरात खाली वर करतो आणि काठी समोर आणणाऱ्यावर शिंग रोखून धरतो. बैलांची ही प्रतिक्रिया त्यांची मरगळ अकड निघण्याचे द्योतक असते. काही ठिकाणी या उधळलेल्या बैलाच्या शिंगावरचे झुपकेदार तुरे जो कोणी तरूण काढतो; त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याच्या मर्दूमकीला साजेसाच असल्याचे दिसून येते. या बैलदिवाळीच्या प्रथेला पोलादपूर तालुक्याच्या एकाच भागात महत्त्व दिसून येत असून, अन्य भागामध्ये ही परंपरा दिसून येत नसल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त होत आहे.







