जुलै ते ऑक्टोबरपर्यंत महावितरणचा ग्राहकांना दरवाढीचा शॉक

। अलिबाग । भारत रांजणकर ।
महावितरणकडून जून ते ऑक्टोबर या कालावधीसाठी इंधन समायोजन भाराचे दर वाढविण्यात आले आहेत.

महावितरणने ‘इंधन समायोजन आकार’ या शुल्कात तब्बल 600 ते 700 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे यापूर्वी कमाल 5 पैसे तर किमान 25 पैसे प्रति युनिट असलेला आकार आता प्रति युनिट 1.35 रुपयांवर गेला आहे. यापूर्वीच डिझेल, पेट्रोल, गॅसचा भडका तसेच जीवनावश्यक वस्तू महागल्या असताना महावितरणने वाढविलेल्या दरवाढीचा ‘हाय व्होल्टेज’ शॉक नागरिकांना लागला आहे.
वीजवितरण कंपन्यांना वीजखरेदी खर्च वाढल्यास त्यापोटी ग्राहकांकडून ‘इंधन समायोजन आकार’ वसूल करण्याची मुभा असते.

महावितरणने या खर्चापोटी 1500 कोटी रुपये एप्रिल 2020 मध्ये राखीव ठेवले होते. मात्र, मागील वर्षी ऑक्टोबरदरम्यान भीषण कोळसा टंचाईदरम्यान महावितरणचा वीजखरेदी खर्च वाढला. त्यामुळे 1500 कोटी रुपये डिसेंबरअखेरीस संपले. त्यानंतर मार्च-एप्रिलदरम्यान पुन्हा कोळसा संकट व वाढत्या वीज मागणीमुळे महावितरणला बाजारातून महागड्या दराने वीजखरेदी करावी लागली होती. अशा सर्व स्थितीत ग्राहकांकडून ‘इंधन समायोजन आकार’ वसूल करण्यास महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज वितरण कंपन्यांना मार्च 2022पर्यंत निर्बंध आणले होते. पण, एप्रिल 2022पासून त्यास मुभा दिली. त्यानुसार महावितरणने एप्रिल महिन्यात आलेल्या देयकापासूनच ‘इंधन समायोजन आकार’ वसूल करण्यास सुरुवात केली.

पण, जूनच्या देयकापर्यंत वसूल केला जाणारा आकार व आता जुलै ते ऑक्टोबरचा आकार यामध्ये मोठी वाढ झाली आहे. ही वाढ तिपटीने अधिक आहे. घरगुती ग्राहकांचा विचार केल्यास मार्च ते एप्रिलसाठीचा किमान इंधन समायोजन आकार 5 पैसे प्रति युनिट, तर कमाल 25 पैसे प्रति युनिट इतका होता.

पाच श्रेणींचा विचार केल्यास सरासरी दर हा 17 पैसे प्रति युनिट होता. मात्र, हाच दर आता जुलै ते ऑक्टोबरदरम्यान येणार्‍या वीज देयकासाठी सरासरी 1.35 रुपये प्रति युनिट झाला आहे. यानुसार आता प्रत्येक घरगुती ग्राहकाचे देयक ऑक्टोबरपर्यंत सरासरी 1.35 रुपये प्रति युनिटने महागली आहे.

इंधन समायोजन आकाराच्या माध्यमातून महावितरणकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे प्रति युनिट जादा पैसे मोजावे लागत असून, परिणामी, वीज बिलातही वाढ झाली आहे. सर्वसामान्य ग्राहकांच्या ही रक्कम आवाक्याबाहेर आहे.

सतीश म्हात्रे, अलिबाग, ग्राहक
Exit mobile version