। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्य शासनाच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात देखील पहिली ते दहावीचे वर्ग सोमवार दि. 31 जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जोत्स्ना शिंदे-पवार यांनी दिली. जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत शिक्षकांची आरसीपीटीआर चाचणी, शाळांचे सॅनिटाझेशन सुरू आहे. ऑनलाईन शिक्षणाला पालकांसोबत विद्यार्थी देखील कंटाळले असल्याने शासनाच्या या निर्णयाचे मोठया प्रमाणावर स्वागत केले जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शाळांचे सॅनिटाझेशन केली जात आहे. पाल्याला शाळेत पाठविण्यासाठी पालकांनीं हमीपत्र तसेच आरोग्य तपासणीचा दाखला बंधनकारक करण्याता आला आहे. जिल्ह्यात एकूण 3 हजार 687 शाळा आहेत. तर 20 हजार 169 शिक्षक संख्या आहे. तर 5 लाख 17 हजार 667 विद्यार्थी आहेत.
शिक्षण विभाग व शाळेने विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या 3 हजार 687 शाळा पुन्हा सुरू होणार असून, 5 लाख 17 हजार 667 विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधा शाळास्तरावर करण्यात येत आहेत. शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयारी करण्यात येत आहे. नोव्हेंबरमध्ये सुरु करण्यात आलेल्या शाळा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आल्या होत्या. फक्त उच्च माध्यमिक, महाविद्यालय सुरु होते. नुकतेच राज्याच्या शिक्षण विभागाने 24 जानेवारीपासून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यास स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. सर्व आढावा घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने शाळा सुरु करण्यास 31 जानेवारीपासून परवानगी देत पालक व शाळांसाठी मार्गदर्शक सूचना सक्तीच्या करण्यात आल्या आहेत.
दोन्ही डोस पुर्ण आवश्यक
शाळा सुरु करताना दोन्ही डोस घेतलेल्या शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांनाच शाळांमध्ये शिकविण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार माध्यमिक विभागातील 6 हजार 267 शिक्षकांनी पहिला तर 8 हजार 546 शिक्षकांनी दोन्ही डोस घेतला आहे. 99 शिक्षकांनी मात्र एकही डोस घेतलेला नाही. तर शिक्षकेतर कर्मचार्यांपैकी 1 हजार 619 कर्मचार्यांनी पहिला तर 2 हजार 350 कर्मचार्यांनी दोन्ही डोस पुर्ण केले आहेत. तर 27 जणांनी एकही डोस घेतलेला नाही.