शेलूपासून रूमेनियापर्यंत – पॉवरगर्ल अमृताच्या शब्दात

| नेरळ | कांता हाबळे |

केवळ मुलगी आहे म्हणून काही वर्षांपूर्वी तिची गर्भातच हत्या केली जायची. मात्र कालांतराने यावर कायदा आल्याने स्त्रीभ्रूण हत्या थांबली असली तरी आजही तू मुलगी आहेस हे शब्द अनेकदा केवळ गावाकडेच नाही तर शहरातही तीच्या कानावर पडतात. मात्र तिचा जन्म हा थांबण्यासाठी नाहीच मुळी ! हे सिद्ध करून दाखवल आहे शेलू येथील अमृता भगत या विद्यार्थिनीने. शिक्षण घेत असताना खेळात आवड निर्माण झालेल्या अमृताने ज्यावेळी मला क्रीडा क्षेत्रात काही तरी करायच आहे सांगितले. तेव्हा तु मुलगी आहेस खेळ तुझे काम नाही हे शब्द ऐकायला मिळाले. पण वडील ज्ञानेश्वर भगत यांनी मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत पाठिंबा दिल्याने अमृताने थेट रूमेनिया गाठत भारताचा झेंडा अटकेपार फडकावला आहे. मात्र तिचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. अनेक अडथळे पार करत अमृताने यश मिळवले आहे. भारत हा नव काही करणाऱ्यांचा देश आहे. या देशाला साहित्य, शैक्षणिक, क्रांतीचा वारसा लाभलेला आहे. पुरुषांसह झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला अशा अनेक महिलांनी देखील या देशात क्रांतीची नवी मशाल केवळ पेटवली नाही तर आजही पुढच्या महिला पिढीकडून तेवत ठेवण्यात आली आहे. महिला आज सर्व क्षेत्रात पुढे आहेत.

पुरुषांच्या खांद्याला लावून त्या काम करत असल्या तरी आजही तू मुलगी असल्याचे शब्द त्यांना ऐकवले जातात हे दुर्दैव आहे. मात्र अशावेळी तिला जर घरातल्यांची साथ मिळाली तर ती जग जिंकू शकते हे अमृता भगत या विद्यार्थिनीने सिध्द केले आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील शेलू मधील रहिवासी आणि नेरळ ममदापूर येथील मातोश्री सुमती टिपणीस महाविद्यालयात अमृता भगत हिचे शिक्षण सुरु आहे. अमृताला लहानपणापासून क्रीडा क्षेत्राचे खूप आकर्षण होते. 10 वी पूर्ण केल्यावर अमृताने घरात आपल्या क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे असल्याचे सांगितले. मात्र याला कडाडून विरोध झाला. त्यामुळे अमृता देखील निराश झाली. मात्र तिचे वडील ज्ञानेश्वर भगत यांनी आपल्या मुलीच्या पंखाला बळ देण्याचे ठरवले. अमृताने क्रीडा विश्वात दमदार पाऊल टाकले. खरंतर तिने कबड्डी खेळात परभणी, आंबेजोगाई येथे झालेल्या सामन्यांमध्ये प्राविण्य मिळवले होते. यावेळी वीरभाई कोतवाल महिला संघातून ती खेळली होती तर मनोज क्षीरसागर व यशवंत वाघरे यांनी तिला मार्गदर्शन केले होते. इथूनच तिची क्रीडा क्षेत्रातील भरारी घेण्यास सुरवात झाली.

यानंतर रग्बी खेळात अमृताने यशश्री खेचून आणली. यानंतर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतअमृताने बाजी मारत गरुड भरारी घेतली ती मागे न वळून पाहण्यासाठीच ! यामध्ये तिचे कोच विक्रांत गायकवाड यांचे तिला मार्गदर्शन आणि साथ लाभली. जिल्हा स्तरावर पॉवरलिफ्टींग 2021 ते 2022 अशी तब्बल चार वेळा सुवर्णपदक मिळवून स्ट्राँग वुमन ठरली होती, तर राज्य स्तरावर पॉवरलिफ्टींग, ऑक्टोबर 2021-रौप्यपदक, मार्च 2022-दोन सुवर्ण, जून 2022-सुवर्णपदक, जुलै 2022-सुवर्ण, डिसेंबर 2022-कांस्यपदक, 2023-रौप्यपदक, पॉवरलिफ्टींग राष्ट्रीय स्तरावर, एप्रिल 2022-केरळ येथे रौप्यपदक, ऑक्टोबर 2022-चंद्रपूर (विदर्भ) येथे रौप्यपदक, मे 2022 तामिळनाडू येथे कांस्यपदक अशी आजवरची कामगिरी तिने केली आहे. तर जून 2023 मध्ये झालेल्या वारसीथ महाराष्ट्र अजिंक्य पद पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये अमृताने कांस्य पदक मिळवले आहे. अमृताच्या या कामगिरीच्या जोरावर तिची निवड जागतिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी करण्यात आली होती. त्यानुसार 21 ऑगस्ट रोजी रूमेनियासाठी अमृता रवाना झाली होती. दिनांक 24 ऑगस्ट रोजी हि स्पर्धा रोमानिया देशातील नापोका शहरात आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने पार पडली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अमृता हिने 47 किलो गटात 120 किलो वजन उचलत इतिहास रचला. 40 देशातील वेगवगेळे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असताना या सर्वांमध्ये अमृताने दुसरा क्रमांक पटकावत रौप्य पदक मिळवले .

हा प्रवास सोपा नव्हता
शेलू येथील गावातील मुलगी क्रीडा क्षेत्रात उतरते आणि थेट रोमानियाला जाते हा प्रवास माझ्यासाठी सोपा नक्कीच नव्हता. पप्पानी खूप साथ दिली ते पाठीशी खंबीर होते म्हणूनच यशाचा हा टप्पा गाठू शकले. घरातून कायम विरोध राहिला पण पप्पानी कोणाचेच ऐकले नाही. तर माझे कोच यांनी माझ्यावर मेहनत घेतली म्हणूनच त्यांच्या मेहनतीच चीज मी करू शकले. खरंतर माझी सुरुवात हि कबड्डी, खोखो, रग्बी अशी झाली होती. मात्र प्री ऑलम्पिक मध्ये माझ्या पायाला दुखापत झाली पण खेलो इंडियामध्ये माझे सिलेक्शन होऊ शकले नाही. त्यामुळे मी पॉवर लिफ्टिंगकडे वळले. जर तेव्हा माझ्या पायाला दुखापत झाली नसती तर मी आज पॉवर लिफ्टर खेळाडू नसते.

थोडसं अवघडले पण सांभाळलं स्वतःला
जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत माझी निवड झल्याची बातमी ऐकून खूप खुश झाले होते. तशी जबाबदारी मोठी होती. म्हणून आणखी मेहनत घेण्यास सुरुवात केलेलीच. 21 ऑगस्ट रोजी रोमानियाचा प्रवास सुरु झाला. प्रत्यक्ष तिकडे पोहचल्यावर 24 ऑगस्टला स्पर्धा पार पडणार होती. मी तिथे पोहचल्यावर सगळे इंग्लिशमध्ये बोलणारे होते आणि मी एकटीच मराठी आणि हिंदीमध्ये बोलायचे. माझे इंग्रजी तेव्हढ चांगले नव्हते. त्यामुळे खरेतर मी थोडसे अवघडले होते. शाळेचा पहिला दिवस असल्यावर जसे सगळे अनोळखी असतात आणि आपण त्यात गोंधळतो तशी अवस्था माझी झाली होती. पण स्पर्धेचा दिवस जसा जवळ येत गेला तसे मात्र सगळे ओळखीचे होत गेले. हा एक मजेदार आणि गमतीशीर अनुभव असल्याचे देखील अमृताने सांगितले.

लय भारी वाटतय
मी जेव्हा रोमानियावरून परत आले तेव्हा माझ्या गावात माझे धडाक्यात स्वागत झाले. अनेकांनी माझा सत्कार केला. सेलेब्रिटी असल्यासारख सगळे माझ्यासोबत सेल्फी, फोटो काढतात. हे फिलिंग खूप भारी आहे. पण जेव्हा खरच सर्वांची गरज होती तेव्हा माझे पप्पाच माझ्या सोबत होते. त्यामुळे माझ्या पप्पाना मनापासून धन्यवाद त्यांच्यामुळे आणि माझे कोच विक्रांत गायकवाड यांच्यामुळे हे शक्य झाले, असे अमृता म्हणाली. जास्तीत जास्त मुलींनी क्रीडा क्षेत्राकडे एक करीअर म्हणून पहावे.

Exit mobile version