राज्यसभा निवडणुकीतील निकालावरुन मविआ, भाजपात कलगीतुरा

। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यसभा निवडणुकीतील जय-पराजयावरुन आता मविआ आणि भाजप यांच्यात आरोप, प्रत्यारोपाच्या फैर्‍या झडू लागल्या आहेत. केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव अपक्ष आमदारांवर टाकून भाजपने विजय मिळविला असा आरोप शिवसेनेने केला आहे. तर आगामी काळात सरकार चालवून दाखवा, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गोटातील ज्या आमदारांनी आपल्याला मदत केली आहे त्यांना काहीही होणार नाही. कारण महाविकास आघाडीने त्यांच्यावर कारवाई करायची ठरवली तर सरकार पडू शकते, असा गर्भित इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते शनिवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला. राज्यसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर तुम्ही कोणामुळे जिंकले आहात हे आम्हाला माहिती,असा दावा मविआतील काही नेत्यांकडून केला जात आहे. त्यांनी खरंच ही गोष्ट माहिती असेल तर ते आपल्याला मदत करणार्‍यांवर कारवाई करणार नाहीत. याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीला त्यांचे सरकार टिकवायचे आहे. त्यामुळे मविआ आपल्याला मदत करणार्‍यांवर कारवाई करायला गेली तर ते आमदार पक्षाची साथ सोडतीलच. पण त्यांच्यासोबत महाविकास आघाडीत असूनही मनाने आपल्यासोबत असलेल्या व दबावामुळे आपल्याला मदत न करू शकणारे आमदारही सरकारमधून निघून जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. विधानपरिषद निवडणुकीच्या 6 जागा आपण लढवतो आहोत. कोणतीही निवडणूक सोपी नसते. पण सरकारमधील अंर्तविरोध पाहता आणि सिक्रेट बॅलेट वोट सिस्टीम पाहता आपल्याला चांगलं मतदान होईल. सद्सदविवेकबुद्धीला स्मरुन अनेक आमदार आपल्याला मतदान करतील, असा विश्‍वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मी पुन्हा येईन
राज्यसभेची लढाई छोटी होती, मोठी लढाई लढणे आणखी बाकी आहे. येत्या काळामध्ये महानगर पालिका जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळीकडे महाविकास आघाडी सरकारला आपण धुळ चारणार आहोत. मला विश्‍वास आहे की, 2024 मध्ये भाजप स्वत: जोरावर लोकसभेत बाजी मारेल आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपचे सरकार येईल, असा विश्‍वास फडणवीसांनी व्यक्त केला.

केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव
आमच्या चिन्हावर निवडून आलेले पक्षाचे आमदार तिकडे गेले नाहीत तर काही अपक्ष आमदार, काही छोट्या पक्षाचे आमदार त्यांच्याकडे गेले आहेत. त्यांना काही आमिषं दाखवण्यात आली. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार झाल्याचा खा.संजय राऊत यांनी केला.

शिवसेनेने लढवलेल्या सहाव्या जागेसाठी मतांची संख्या कमी होती. तिथे आमचा फरत वाढत होता. पण धाडस करत प्रयत्न केला. आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झाले आहे. यामध्ये वेगळे काही नाही. मान्य केले पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आले आहे.

शरद पवार,राष्ट्रवादी अध्यक्ष
Exit mobile version