। मुंबई । प्रतिनिधी ।
सत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्ष लागण्याची शक्यता नाही, असे खळबळजनक विधान शिंदे गटाचे प्रतोद आ. भरत गोगावले यांनी रोहे येथे केले. पण या विधानावरुन शिंदे गटाला सावरासावर करावी लागली आहे.
गोगावले यांच्या वक्तव्यावरुन, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी न्यायालयांनाही गृहित धरुन राजकारण करण्यास काही लोकांनी सुरुवात केली असल्याची टीका प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. न्यायालयाच्या विलंबाबाबत किती मोठा आत्मविश्वास भरत गोगावले आणि इतर आमदारांना आहे, हे यातून स्पष्ट होत आहे. आता न्यायालयानेच जनतेचा विश्वास टिकवायचा की नाही, हे ठरवायचं आहे, असेही पाटील म्हणाले.
सबुरीची भूमिका
शिंदे गटाने भरत गोगावले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सबुरीची भूमिका घेतली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय किंवा कोणत्याही न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना आमच्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकार्याने, आमदाराने त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, असे ठरले आहे. मुख्यमंत्र्यांनी तशा सूचना दिलेल्या असतानाही अनावधनाने त्यांनी वक्तव्य केले आहे. ही आमची भूमिका नाही, वेळ काढण्याचा आमचा हेतू नाही. न्यायालयाचे कामकाज हे त्यांच्या नियमानुसार होत असून, हा त्यांचा सर्वाधिकार आहे. यापुढे असे वक्तव्य केले जाणार नाही याची काळजी घेऊ.