हवामान आधारित बागायतदारांना मिळणार संरक्षण
| माणगाव | वार्ताहर |
निसर्गाच्या सततच्या बदलत्या हवामानाच्या धोक्यांमुळे फळपीकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होवुन उत्पादनात घट येते आणि शेतकरी, बागायतदारांना नुकसान स्वीकारावे लागते. त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रत्येक वर्षी पुनर्रचीत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येते. नजीकच्या काळात येणाऱ्या आंब्याच्या बहारासाठी योजनेमध्ये सहभागाकरिता विमा पोर्टल सुरु झाले असून कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या कालावधीत सहभागी होऊन फळबागांचे संरक्षण करा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. यामुळे फळपिकाला आता विमा कवच मिळणार आहे.
हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वारा वेग, आर्द्रता इ. माहिती स्वयंचलित रित्या नोंदवली जाते. या माहितीच्या आधारे अवेळी पाऊस, कमी जास्त तापमान, वारा वेग त्याच प्रमाणे गारपीट या हवामान धोक्यांपासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकरी यांना फळपिकांसाठी विमा संरक्षण मिळते. सदर हवामान धोके लागू झाल्यानंतर विमा धारक शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळते. यासाठी शेतकऱ्यांनी जागृत राहून फळपिक विमा संरक्षण नोंदणी करावी.
जिल्हासाठी भारतीय कृषि विमा कंपनी लि. या कंपनी मार्फत योजना राबविण्यात येत आहे, योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुद्दत काजू व आंबा पिकाकरीता दि. 30 नोव्हेंबर अंतिम मुदत आहे, या योजनेचा विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र सीएससी, बँक तसेच, www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावा. अधिकच्या माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा. तसेच, पीक विम्यासाठी फळपिकांची नोंद सात बारा उताऱ्यावर असणे बंधनकारक असल्याने ई-पीक ॲपद्वारे फळपिकांच्या नोंदी करून घेण्याचे व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन माणगाव तालुका कृषी अधिकारी अजय वगरे यांनी केले आहे.